गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाह वाहिनीने नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. याच वाहिनीवर येत्या २ मे पासून रात्री ९ वाजता तुझेच मी गीत गात आहे ही नवी मालिका दाखल होत आहे. बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उर्मिला कोठारे या मालिकेतून पुनरागमन करत आहे त्यामुळे ती या मालिकेबाबत खूपच उत्सुक आहे. अन्वी तायवडे ही बालकलाकार या मालिकेतून मराठी मालिकासृष्टीत पाऊल टाकत आहे. अन्वी या मालिकेत स्वराची मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. तर अभिजित खांडकेकर या मालिकेत स्वराच्या बाबांची म्हणजेच मल्हार कामतची भूमिका निभावणार आहे.

मालिका म्हटल्यावर नायक नायिका असणार हे ठरलेलं गणित मात्र जर खलनायिका नसतील तर मालिका पाहायला फारशी मजा येत नाही. त्यामुळे या मालिकेला तगड्या नायक आणि नायिकेसोबत तितकीच तगडी खलनायिका देखील असणे हेही तितकेच आवश्यक आहे. अभिनेत्री प्रिया मराठे या मालिकेतून खलनायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रिया मराठे हिने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खलनायिकेच्या भूमिका रंगवल्या आहेत. त्यामुळे ती ही भूमिका तितक्याच ताकदीने उभारू शकते असा विश्वास आहे. तुझेच मी गीत गात आहे ही मालिका एका बंगाली मालिकेचा रीमेक आहे ‘पोटोल कुमार गानवाला’ असे या बंगाली भाषिक मालिकेचे नाव होते. हीच मालिका ‘कुल्फी कुमार बाजेवला’ या नावाने हिंदी मध्ये बनवण्यात आली होती. कुल्फी कुमार बाजेवला या मालिकेत एका गायकाला गावातील मुलीसोबत प्रेम होते तो तिच्याशी लग्न करतो मात्र तू मला किंवा गाण्याला दोन्हीपैकी एकच गोष्ट निवडू शकतोस असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो तेव्हा तो गाण्याला निवडतो. आपल्या बायकोला सोडून तो मुंबईत निघून जातो.

पण इकडे त्याची पत्नी गरोधर असते हे दोघांनाही माहीत नसते. मुलीच्या जन्मानंतर आईचा मृत्यू होतो पण ही मुलगी आपल्या गोड गळ्याने सगळ्यांची मने जिंकून घेते. परंतु आपला बाप कोण हा प्रश्न तिच्यासाठी अनुत्तरीतच राहतो. याच प्रश्नांची उत्तरं शोधणारी ही स्वरा २ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गोड गळ्याची स्वरा पुढे संघर्ष करत मोठी होऊन गायन क्षेत्रात नाव कमावते. हे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अशा आगळ्या वेगळ्या कथेची उत्सुकता मालिकेच्या प्रोमोमधूनच अधिक वाढलेली पाहायला मिळत आहे. उर्मिला कोठारे, अन्वी तायवडे, अभिजित खांडकेकर, प्रिया मराठे असे तगडे कलाकार या मालिकेला लाभले आहेत त्यामुळे ही मालिका निश्चितच प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवणार अशी आशा आहे.