तू तेव्हा तशी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद मिळाला असून टीआरपीच्या रेसमध्ये या मालिकेने टॉप १० च्या यादीत आपले नाव नोंदवले आहे. मालिकेत अनामिका आणि सौरभची प्रेमकहाणी हळूहळू पुढे सरकलेली पाहायला मिळत आहे. मालिकेतील चिमणे कुटुंब प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. ही पात्र साकारणाऱ्या कलाकारांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.. चंदू चिमणेची विनोदी भूमिका किरण भालेराव याने साकारली आहे. किरण भालेराव हा चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेता आहे. त्याने हिंदी चित्रपटांमधून मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.

किरण भालेराव याने मराठी सृष्टीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. खास करून विनोदी भूमिकांमुळे किरणला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. किरण भालेराव हा मूळचा नाशिकचा. नाशिक येथील पेठे हायस्कुल आणि बी वाय के कॉलेज मधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय बिजनेस मॅनेजमेंटचे शिक्षणही त्याने घेतले आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच किरण भालेराव नाटकांमध्ये काम करत असे. पुढे पोटापाण्यासाठी बँकेत नोकरी केली मात्र नोकरीमध्ये फारसे मन रमले नाही. नाटकात काम करण्याची ईच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यासाठी बँकेतून वारंवार सुट्ट्या घ्याव्या लागायच्या. दरवेळी वेगवेगळे कारण देऊन सुट्ट्या घेणे हे अंगलट येत असल्याचे पाहून किरणने नोकरी किंवा अभिनय या दोन पर्यायापैकी एका पर्यायाची निवड करण्याचे ठरवले. अर्थात अभिनय ही आपली आवड असल्याने त्याने लगेचच नोकरीला रामराम ठोकला. २००९ साली झी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये किरणने पार्टिसिपेट केले होते. विनोदाचे अचूक टायमिंग हेरून आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्याने प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली. कलर्स मराठीवरील गणपती बाप्पा मोरया या मालिकेत किरणला नंदी महाराजांची भूमिका मिळाली. त्याने साकारलेला नंदी महाराज प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला.

झी मराठीच्याच बाजी या आणखी एका मालिकेतून तो खंडेराव सरदारची तगडी भूमिका साकारताना दिसला. स्टार प्रवाहवरील जिवलगा, सोनी सबवरील मंगलम दंगलम अशा अनेक मालिकेतून त्याने विविधांगी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. मालिकेत चिमणेची पत्नी दिशा दानडे हिने साकारली आहे. याअगोदर दिशाने सांग तू आहेस का या मालिकेत गंभीर भूमिका साकारली होती. मालिकेतील सीमाची तिची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती यातले तिचे विदर्भी भाषेचे बाज असलेले डायलॉग देखील प्रचंड लोकप्रिय झाले होते. दिशाचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला तो कॉलेजमधील एकांकिका आणि नाट्यस्पर्धामधून. परंतु तिने या क्षेत्रात काम करणे तिच्या घरच्यांना मुळीच पसंत नव्हते. राज्यनाट्यस्पर्धेत तिला उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक मिळाले त्यावेळी तिच्या वडिलांनी या क्षेत्रात येण्यासाठी तिला परवानगी दिली होती. जागो मोहन प्यारे, सांग तू आहेस का अशा मालिकांमधून दिशाने आपल्या अभिनयाची छाप सोडली. तू तेव्हा तशी या मालिकेत दिशाने विनोदी भूमिका साकारली आहे. चंदूवर धाक ठेवणारी चंदू चिमणेची बायको तिने आपल्या अभिनयाने सुरेख वठवली आहे. मालिकेत चिमणे कुटुंब मिश्किल स्वभावाचे असल्याने त्यांची ही जोडी प्रेक्षकांना भावली आहे. मालिकेत चिमणे कुटुंबाला याच कारणामुळे पुरेसा वाव देण्यात आला आहे. मालिकेचे शूटिंग पुण्यात होत असल्याने अनेक ओळखीची ठिकाणं या मालिकेतून पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पुण्याची प्रेक्षक मंडळी या मालिकेवर खुश आहेत.