
आपल्या डोळ्यादेखत मोठी होत असलेली लेक जेव्हा तिच्या आवडत्या क्षेत्रात करिअरच्या वाटेवर पहिले पाऊल टाकते तेव्हा बाप म्हणून प्रत्येकालाच अभिमान वाटत असतो . मग ती व्यक्ती सर्वसामान्य असो किंवा सेलिब्रिटी कलाकार. लेकीचे कौतुक करण्याची संधी कोणताच बाप हातची घालवत नाही . मग त्याला कवी संदीप खरे हा देखील अपवाद कसा काय ठरेल बरं ! एक संवेदनशील कवी आणि अभिनेता असलेल्या संदीप खरे याच्याही आयुष्यात सध्या ही अभिमानाची फेज आली आहे . संदीपची मुलगी रुमानी खरे हिने तिच्या आवडत्या अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले असून ‘तू तेव्हा तशी’ या नव्या मालिकेत ती स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांच्या सोबत झळकली आहे.

या मालिकेचा पहिलाच एपिसोड 20 मार्चला प्रदर्शित झाला आणि याच निमित्ताने संदीप खरे याने लाडक्या लेकीच्या टीव्हीवरील पदार्पणाला शुभेच्छा देत हा आनंद चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे .संदीपने इन्स्टा पेजवर ही गोष्ट शेअर केली आहे. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमामुळे संदीप खरे आणि डॉ . सलील कुलकर्णी ही जोडी मराठी काव्य जगतात प्रसिद्ध झाली . संदीप अगदी वयाच्या आठव्या वर्षापासून कविता करतो . तो कवी असण्याबरोबरच उत्तम अभिनेताही आहे . त्याने अनेक लघुपटातही काम केले आहे . त्यामुळे संदीपची मुलगी रुमानी काव्यक्षेत्राकडे वळेल की अभिनय क्षेत्र निवडेल की तिचे अजून कुठलं वेगळं क्षेत्र असेल ? याबाबत नेहमीच संदीपलाही उत्सुकता होती . पण संदीप आणि त्याची पत्नी सोनिया यांनी रुमानीला नेहमीच तिच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याचं प्रोत्साहन दिलं . तसं पाहायला गेलं तर रुमानी शालेय वयापासूनच अभिनय करते. याशिवाय तिने नृत्याचे धडेही गिरवले आहेत . अभिनयातच करिअर करण्याचे स्वप्न रुमानीने पाहिलं आणि त्याला संदीप आणि सोनिया यांनी पाठबळ दिलं. गेल्या काही दिवसांपासून तू तेव्हा तशी या मालिकेचा प्रोमो ची जोरदार चर्चा सुरू आहे या मालिकेत प्रमुख भूमिकेत स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांच्याबरोबरच अभिज्ञा भावे हिचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे . त्यांच्यासोबतच रुमानी खरे हा नवा आणि फ्रेश चेहरा दिसणार आहे . रुमानीची ही पहिली मालिका असली तरी अभिनय क्षेत्रात मात्र तिने बाल कलाकार म्हणून सुरुवात केली आहे .रुमानीला अभिनयाची फार आवड आहे.

2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित ‘चिंटू’ आणि 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिंटू 2’ या चित्रपटांमध्ये रुमानी झळकली होती. बालकलाकार म्हणून तिने काम केलं होतं. अभिनयासोबतच तिला नृत्याचीही फार आवड आहे. रुमानीने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. 2019 मधील ‘आई पण बाबा पण’ या नाटकात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. रुमानी खरे हीने अभिनव विद्यालय तसेच एस पी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अभिनयासोबतच कथ्थक नृत्याची देखील तिला विशेष आवड आहे. मधल्या काळात बालभारतीने एक डॉक्युड्रामा साकारला होता त्यात रुमानीला देखील झळकण्याची संधी मिळाली होती. बालभारतीचा प्रेरक इतिहास आणि संस्थेने आजवर केलेली प्रगती नव्या पिढीला समजावी म्हणून हा डॉक्युड्रामा बनवण्यात आला होता. तर कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आता टीव्हीवरील मालिकाविश्वात रुमानीचं आगमन होत असताना बाप म्हणून संदीप खरे यालाही खूप आनंद झाला आहे .