झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उत्कृष्ट कथानक आणि मालिकेतील जाणते कलाकार यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचा नायक सौरभ सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. आपल्या नवऱ्याला नोकरी मिळावी म्हणून वल्ली एक लाख रुपये जमवण्यासाठी सौरभच्या मागे लागली आहे. त्यामुळे या अडचणीत अनामिका सौरभची मदत करणार का हे येत्या काही भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हे एक लाख जमवण्यासाठी सौरभ आईच्या बांगड्या गहाण ठेवण्याचा विचार करत असतो तेवढ्यात माई मावशी येऊन सौरभला ताईच्या बांगड्या गहाण ठेवण्यास विरोध करतात आणि ह्या माझ्या आईच्या बांगड्या होत्या तिने ताईला दिल्या होत्या त्यामुळे ह्या बांगड्या तू गहाण ठेवायच्या नाहीस म्हणून ठणकावून सांगतात.

मात्र माई मावशींच्या या विरोधाचा वल्लीला राग येत असतो. ती त्यांना घरातून हाकलून लावायचा प्रयत्न करते मात्र खमकी माई मावशी वल्लीला माझाही ह्या घरावर हक्क आहे असे ठणकावून सांगते. वल्ली आणि तिच्या वडिलांना वठणीवर आणण्यासाठी ही माईमावशी वेळोवेळी पदर खोसून सौरभच्या मदतीला धावून जाताना दिसत आहे. सौरभचे अनामिकासोबत लग्न व्हावे म्हणून माई मावशी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांना विशेष भावलेले पाहायला मिळत आहे. ही माई मावशींची भूमिका साकारली आहे अभिनेत्री उज्वला जोग यांनी. उज्वला जोग या मराठी सृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. नुकतेच पावनखिंड या चित्रपटात त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या मातोश्री बयोबाई देशपांडे ही दमदार व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवरील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जातात. कुंकू लावते माहेरचं, नवरा बायको, सौभाग्य कांकन, कन्यादान, जाऊ तिथे खाऊ, हम बने तुम बने, झिम्मा, मित्राची गोष्ट अशा चित्रपट, मालिका तसेच नाटकांमधून सोज्वळ तर कधी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. सूर्याची पिल्ले, ढोल ताशे, लुका छुपी हि, शांतेचं कार्ट चालू आहे त्यांनि अभिनित केलेली प्रसिद्ध नाटकं आहेत.

उज्वला जोग या प्रसिद्ध अभिनेते अनंत जोग यांच्या पत्नी आहेत. अनंत जोग यांनी मराठी हिंदी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत बहुतेकदा त्यांच्या वाट्याला विरोधी भूमिका आलेल्या पाहायला मिळतात. नुकतेच स्वराज्य सौंदमीनी ताराराणी या मालिकेत ते दिसले आहेत. अभिनेत्री क्षिती जोग ही त्यांची एकुलती एक मुलगी. क्षिती देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिची ‘दामिनी’ मालिकेतील इन्स्पेक्टरची भूमिका विशेष गाजली होती. गंध फुलांचा गेला सांगून, तू तिथे मी या मालिकांत तिने काम केले आहे. घर की लक्ष्मी बेटियां, साराभाई vs साराभाई, ये रिशता क्या केहलाता है या हिंदी मालिकेतही तीने उत्तम भूमिका साकारल्या आहेत. मराठी अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे याच्याशी क्षिती विवाहबद्ध झाली. क्षितीची आज्जी शांताबाई जोग या देखील अभिनेत्री होत. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब गेल्या कित्येक दशकांपासून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. उज्वला जोग यांनी साकारलेली माई मावशीची भूमिका मुख्य नायक आणि नायिके इतकीच दमदार असल्याने ही भूमिका उठावदार वाटते.