झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेत अनामीका आणि सौरभ पटवर्धनची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मात्र अनामीकाची आई म्हणजेच कावेरी आईच्या एंट्रीने मालिका एका वेगळ्याच ट्रॅकवर गेलेली पाहायला मिळाली. कावेरी आई अनामिका आणि सौरभच्या प्रेमकहाणीत मोठा अडथळा ठरली आहे. तिच्या तत्वामुळे ती तिच्या लेकीचेही सुख नेमके कशात आहे हे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. तिच्या अशा बेधडक वागण्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर एखाद्या विरोधी पात्राचा राग येणे हीच त्या कलाकाराच्या उत्कृष्ट अभिनयाची पावती ठरत असते. अशीच एक पावती कावेरीच्या पात्राला मिळाली आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

मालिकेत अनामीकाची आई म्हणजेच कावेरी आईची भूमिका अभिनेत्री ‘रमा अतुल नाडगौडा’ यांनी साकारली आहे. रमा नाडगौडा या प्रख्यात साहित्यिका नाट्य, चित्रपट, मालिका अभिनेत्री आहेत. एक प्रसिद्ध लेखिका आणि दिग्दर्शिका अशीही त्यांची ओळख आहे. रमा नाडगौडा यांना अभिनयाचे बाळकडू त्यांच्या आईकडूनच मिळाले होते. त्यांची आई लता या नाट्य अभिनेत्री होत्या. आईच्या पावलावर पाऊल टाकत रमा यांनी देखील अभिनय क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. माहीम येथे तेलाची वाडीत त्यांचे बालपण गेले. अभिनव सहकार विद्यालय तसेच चेतनाज हजारीमल सोमाणी कॉलेजमधुन त्यांनी बी कॉमचे शिक्षण घेतले. सध्या आपल्या कुटुंबासोबत त्या पुण्यात वास्तव्यास आहेत. ‘सुचरिता’ या नावाने त्या लेखन करतात. सोशल मीडियावर सुचरिता नावाने त्यांचे काही लेख तुम्हाला वाचायला मिळतील. ‘जान साब ने बुलाया है’ या कथासंग्रहाचे त्यांनी लेखन केले आहे. २०१८ सालचा खळबळजनक बहुचर्चित कथासंग्रह म्हणून हे पुस्तक लोकप्रिय झाले होते. संगीत कुलवधू हे दोन अंकी नाटक, रेडिमिक्स चित्रपट अशा प्रोजेक्टमधून त्यांनी अभिनय साकारला आहे. प्रसिद्ध वृत्तपत्राच्या सप्तरंग या सदरात त्यांनी पाककला एक रस्सा स्वाद वर लेख लिहिले आहेत.

ऍनी मरे यांच्या ‘माय डॉटर माय मदर’ आणि प्रकाश अय्यर यांच्या ‘सवय जिंकण्याची’ पुस्तकांचा अनुवाद रमा नाडगौडा यांनी लिहीला आहे. तू तेव्हा तशी मालिकेतून रमा नाडगौडा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या कावेरी आईची भूमिका तेवढीच चपखल बसल्याने प्रेक्षकांच्या टीकेला त्यांना सामोरे जावे लागत आहे. आता कावेरी आई अनामिकाची बाजू समजून घेतली का आणि त्या तिला सौरभ सोबत लग्नाला परवानगी देणार का हे येत्याच काही दिवसात स्पष्ट होईल. तूर्तास कावेरी आईने या मालिकेचा महत्वाचा ट्रॅक सांभाळला असल्याने प्रेक्षकांना त्यांना अजून थोडे दिवस सहन करावे लागणार आहे. अर्थात त्यांच्या होकारानंतर पट्या आणि अनामिका विवाहबद्ध होतील अशी अपेक्षा आहे. या दमदार भूमिकेसाठी रमा नाडगौडा यांना मनःपूर्वक शुभेच्छा….