स्टार प्रवाह वाहिनीने गेल्या काही दिवसात नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी निवेदिता सराफ यांची मुख्य भूमिका असलेली ‘आई बाबा रिटायर होत आहेत’ ही नवीन मालिका दुपारी २ वाजता प्रसारित होत आहे. त्यामुळे आई कुठे काय करते या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. तर अभिनेत्री मृणाल दुसानीस, विजय आंदळकर, ज्ञानदा रामतीर्थनकर, विवेक सांगळे यांची महत्वपूर्ण भूमिका असलेली ‘ लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका १६ डिसेंबर पासून रात्री ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
त्यामुळे यावेळी प्रसारित होत असलेली ‘साधी माणसं’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते अथवा प्रसारणाच्या वेळेत बदल केला जाऊ शकतो. याच जोडीला स्टार प्रवाह वाहिनी आणखी एक ३ री मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. येत्या २३ डिसेंबर पासून रात्री १०.३० वाजता ‘ तू ही रे माझा मितवा’ ही मालिका प्रसारित होत आहे. त्यामुळे रात्री १०.३० वाजता प्रसारित होत असलेली अबोली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे दिसून येते. दरम्यान तू ही रे माझा मितवा ही मालिका ‘इस प्यार को क्या नाम दू’ या हिंदी मालिकेचा रिमेक असणार आहे. अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिजित आमकर हे दोघे या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यातील ही फ्रेश जोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. येत्या डिसेंबर महिन्यात स्टार प्रवाहच्या जवळपास ३ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या ३ नव्या मालिकांचे प्रेक्षकांनी स्वागतच केलेले पाहायला मिळत आहे. तर सिद्धार्थ जाधवच्या होऊ दे धिंगाणा या शोचीही प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे निश्चितच स्टार प्रवाह वाहिनी तिचा टीआरपी टिकवून ठेऊ शकेल असा विश्वास आहे.