
मालिकांचा टीआरपी हा सर्वस्वी प्रेक्षकांच्या निर्णयावर अवलंबून असतो. प्रेक्षकांनी ठरवलं तर मालिका एका झटक्यात वर आणतात नाहीतर बघणे बंद करून तिला निरोप द्यायला लावतात. जवळपास गेले २ वर्ष स्टार प्रवाहची ‘ठरलं तर मग ‘ ही मालिका महाराष्ट्राची आवडती मालिका ठरली होती. मात्र मालिकेचे कथानक पुढेच सरकत नसल्याने प्रेक्षकांनी या मालिकेवर थोडीशी नाराजी दर्शवण्यास सुरुवात केली. अर्जुन आणि सायली या जोडीने एकत्र यावे ही तमाम प्रेक्षकांची इच्छा होती. या दोघांचे जेव्हा कधी सूत जुळेल असे वाटत होते तेव्हा मात्र कथानकात ट्विस्ट आणून प्रेक्षकांचा हिरमोड झाला. बरेच प्रयत्न करूनही हे दोघे एकत्र येत नसल्याचे पाहून आता प्रेक्षकांनी या मालिकेला थोडासा कमी प्रतिसाद दिला.

त्यामुळे गेल्या आठवड्यात मालिकेचा टीआरपीदेखील खाली घसरलेला पाहायला मिळाला. परिणामी स्टार प्रवाहची ‘ लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल ठरली. अद्वैत आणि कला या जोडीवर आता प्रेक्षकांनी प्रेम दाखवण्यास सुरुवात केली आहे. मालिकेत गेल्या काही दिवसात अनेक सकारात्मक बदल घडून आले. अद्वैत आणि कला एकमेकांना समजून घेऊ लागले याशिवाय नयनाचा खोटारडेपणा देखील सर्वांसमोर उघड झाला. त्यामुळे प्रेक्षकांनी मालिकेला चांगला प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. दरम्यान लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत देखील बरेच बदल घडले अभिनेता ध्रुव दातार आणि अपूर्वा सपकाळ यांनी एकापाठोपाठ मालिकेतून काढता पाय घेतला.

पण असे असले तरी मालिकेच्या लोकप्रियतेत थोडासाही बदल झाला नाही उलट टीआरपी अधिकच वाढत गेला. आपली मालिका लोकांना आवडावी म्हणून कलाकार नेहमीच प्रयत्नात असतात. त्यामुळे लक्ष्मीच्या पावलांनी मालिका नंबर १ वर येताच कलाकारांनी याचे थाटात सेलिब्रेशन केलेले आहे. मालिकेच्या सेटवर केक कापून हे सेलिब्रेशन करण्यात आले. शिवाय हा सोहळा साजरा करताना प्रेक्षकांना टिकवुन ठेवण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर आली आहे. तूर्तास मालिकेच्या या यशाचे कौतुक तर व्हायलाच हवे ना!.