मालिकेत एकत्र काम करत असताना सहकलाकार म्हणून रोज भेटणाऱ्या दोघांमध्ये छान मैत्री होते. मालिकेच्या कथानकाची गरज म्हणून ती केमिस्ट्री बॉंडिंग दाखवावं लागतं. पण या मैत्रीतून प्रेम फुलतं. आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये एकत्र काम करणाऱ्या कलाकारांनी आयुष्यभर एकमेकांचे जोडीदार होण्याचा निर्णय घेतला आहे. आता अशाच एका जोडीने नुकताच साखरपुडा केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही गुडन्यूज दिली. ती परत आलीय या मालिकेतील विक्रांतची भूमिका करणारा नचिकेत देवस्थळी आणि रोहिणीच्या भूमिकेतील तन्वी कुलकर्णी हे एकमेकांच्या आयुष्यात कायमस्वरूपी परत आलेत.

ती परत आलीय ही रहस्यमय मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली होती. शंभर भागांची ही मालिका खूप गाजली. कॉलेजमधील मित्रमैत्रीणींच्या ग्रुपमधील एका मैत्रिणीचा खून होतो आणि त्यासाठी सगळा ग्रुप जबाबदार असतो. दहा वर्षांनी मित्रमैत्रिणी रियुनियनसाठी एका रिसॉर्टवर येतात आणि त्याठिकाणी एकामागून एक ग्रुपमधील सदस्यांचे खून होतात. ते कोण करतं आणि शेवटी ग्रुपमधलं कोण बचावतं अशी या मालिकेची कथा होती. अत्यंत रंजक आणि उत्सुकता ताणवून ठेवण्यात या मालिकेने बाजी मारली होती. बाबुराव, सायली, सतेज, अनु, विक्रांत, रोहिणी, अभय, हनम्या ही पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेत विक्रांत आणि रोहिणी हे खरंतर नेहमी भांडताना दाखवले होते, पण प्रत्यक्षात विक्रांत फेम नचिकेत आणि रोहिणी फेम तन्वी यांच्यात खास नातं तयार झालं. या मालिकेचं शूटिंग एका रिसॉर्टवरच असल्याने शूटिंग संपल्यानंतरही नचिकेत आणि तन्वी यांना एकमेकांसोबत घालवण्यासाठी खूप वेळ मिळाला. मालिकेतील सगळयाच कलाकारांमध्ये छान मैत्री झाली होती. मालिका संपल्यानंतरही कलाकारांचा ग्रुप अनेकदा भेटत होता. अजूनही त्यांच्यात छान बाँडिंग आहे. मालिकेच्या सेटवरच तन्वी आणि नचिकेत यांनी एकमेकांना प्रपोज केलं होतं.

नुकताच या दोघांनी साखरपुडा केला. हमसफर अशी कॅप्शन देत तन्वीने शेअर केलेल्या फोटोने या दोघांच्याही चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या फोटोवर चाहत्यांनी अभिनंदन अशा कमेंट केल्या आहेत. मालिकेतील कलाकारांकडून अशा बातम्या येणं याची चाहत्यांनाही आता सवय झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही मालिकेतील जोड्या प्रत्यक्षातही नात्यात बांधताना आवडतात. मालिकेच्या निमित्ताने भेटलेल्या तन्वी आणि नचिकेतच्या साखरपुड्याने खुश असलेल्या त्यांच्या चाहत्यांना आता ते लग्नाची तारीख कधी जाहीर करतात याचे वेध लागले आहेत. तन्वीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नाटकापासून अभिनयाची सुरूवात केली. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत ती सगुणाबाईंच्या भूमिकेत दिसली. जुळता जुळता जुळतंय की या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका केली होती. स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतील तन्वीची भूमिकाही आव्हानात्मक होती. अ ट्रायल बिफोर मान्सून या शॉर्टफिल्ममध्ये तन्वीने डॉ. मोहन आगाशे यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे. नचिकेतच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झाल्यास त्यालाही नाटकाची आवड आहे. सुखन या नाटयविषयक कार्यक्रमाशी तो जोडलेला आहे. महानिर्वाण या नाटकात नचिकेतची भूमिका गाजली.