झी मराठी वाहिनीवर येत्या १६ ऑगस्ट पासून देवमाणूस या मालिकेच्या जागी रात्री १०.३० वाजता आता नवी मालिका सुरू केली जाणार आहे. ‘ती परत आलीये’ असे टायटल असलेल्या या मालिकेने नुकत्याच येऊ घातलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सध्या देवमाणूस ही मालिका लहान मुलं देखील पाहत आहेत त्यामुळे असे प्रोमो टीव्ही वर दाखवले जाऊ नयेत अशी मागणी वाहिनीच्या प्रेक्षकांनी केली आहे. मालिकेचा या आठवड्यात आलेला प्रोमो खरोखरच लहान मुलांसाठी भीतीदायक असून आम्ही या मालिकेला विरोध करतोय असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

मालिकेचे स्वागत… त्याला होणारा विरोध ह्या गोष्टी आता नव्या नसल्या तरी मालिका जोरदार चालणार अशी चर्चा आहे. ती परत आलीये या मालिकेच्या प्रोमोमध्ये सुरुवातीला अभिनेते विजय कदम यांची झलक पाहायला मिळाली मात्र इतर कलाकारांबद्दल अद्यापही मालिकेने खुलासा केला नाही. परंतु मुख्य भूमिकेत कोणते कलाकार झळकणार आहेत हे नुकतेच समोर आले आहे त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात… ती परत आलीये या मालिकेत विजय कदम यांच्यासह आणखी काही प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत त्यात अभिनेत्री “कुंजीका काळवींट” हिचे नाव नुकतेच समोर येत आहे. ‘एक निर्णय’ या चित्रपटातून कुंजीकाने मराठी सृष्टीत पहिले पाऊल टाकले होते. २०१६ साली कुंजीकाने मटा श्रावण क्वीन बनण्याचा मान पटकावला होता. ‘स्वामीनी’ या लोकप्रिय मालिकेत तिने आनंदीबाईची भूमिका साकारली होती. ही विरोधी भूमिका असल्याने कुंजीकाला प्रेक्षकांच्या रोशाला सामोरे जावे लागले होते. ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत तिने प्रियाची भूमिका साकारली होती.

एक निर्णय या चित्रपटात आणि चंद्र आहे साक्षीला या मालिकेत तिला सुबोध भावे सोबत काम करता आले होते. अभिनेत्री कुंजीका काळवींट आता झी मराठी वरील ‘ती परत आलीये’ मालिकेत प्रमुख भूमिका बजावणार आहे. कुंजीकासोबत अभिनेता “श्रेयस राजे” मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत श्रेयसने राजकुमारची भूमिका साकारली होती. याअगोदर ‘भेटी लागी जिवा’ ही सोनी मराठीवरील मालिका आणि ‘जिगरबाज’ मालिका त्याने अभिनित केली होती. श्रेयस उत्तम कवी असून त्याच्या अनेक कविता सोशल मीडियावर पाहायला मिळतील. अभिनयासोबतच श्रेयस लेखक देखील आहे.अभिनेत्री कुंजीका काळविंट आणि अभिनेता श्रेयस राजे या दोघांना ती परत आलीये मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…