द कश्मीर फाईल्स हा बहुचर्चित चित्रपट दुसऱ्या आठवड्यात देखील रेकॉर्डब्रेक कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या. हा आपल्या देशाचा इतिहास आहे आणि हा आपला चित्रपट आहे. या चित्रपटातून आम्हाला १९९० साली घडलेल्या घटनेचं विदारक सत्य समजलं अशीच भावना आता व्यक्त होताना दिसत आहे. प्रेक्षकांचा दिलखुलास प्रतिसाद मिळाल्याने द कश्मीर फाईल्स हा चित्रपट १०० कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे. अवघ्या ७ दिवसात या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर तब्बल १०६.८० कोटींची कमाई केली आहे.

द कश्मीर फाईल्स या चित्रपटाला पहिल्या दिवशी जगभरातून ६३० हुन अधिक स्क्रिनिंग मिळाल्या होत्या. त्यानंतर या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून स्क्रिनिंग वाढवल्या आणि आज ८ व्या दिवशी जगभरातून तब्बल ४००० हजाराहून अधिक स्क्रिनिंग या चित्रपटाला मिळाल्या आहेत. चित्रपट विश्लेषक आणि समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. दुसऱ्या आठवड्यात देखील चित्रपटाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रेकॉर्ड ब्रेक करणारी कमाल पाहून तरण आदर्श यांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यामुळे आलिया भट्टच्या गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाला देखील द कश्मीर फाईल्स चित्रपटाने चांगली टक्कर दिली आहे. गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी रिलीज करण्यात आला. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरातून १७९.३१ करोडोंचा गल्ला जमवला आहे. मागच्या आठवड्यात द कश्मीर फाईल्स चित्रपट प्रदर्शित करण्यात आला त्यामुळे गंगुबाई बॉक्सऑफिसवर सफसेल आपटला असल्याचे दिसून येते.

याशिवाय आज १८ मार्च रोजी अक्षय कुमार आणि क्रिती सेननची प्रमुख भूमिका असलेला ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे अगोदरच द कश्मीर फाईल्स चित्रपटाने ४००० हुन अधिक स्क्रिनिंग वर कब्जा मिळवला असल्याने बच्चन पांडेची टीम घाबरली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडेच्या राधे श्याम या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफीसवर १७५ हुन अधिक कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र राधे श्याम हा बिग बजेट मुव्ही आहे त्यामुळे या चित्रपटाने म्हणावा तसा प्रेक्षकवर्ग मिळवला नाही त्यात आता द कश्मीर फाईल्स चित्रपटाला जगभरातून अधिक स्क्रिनिंग मिळू लागल्याने या चित्रपटाच्या टीमला कमाई बाबत शंका वाटू लागली आहे.