तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून अवितरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. सर्वात लोकप्रिय हिंदी मालिका म्हणून या मालिकेने कित्येक वर्षांपासून टीआरपीच्या बाबतीती आपला अग्रेसर क्रमांक देखील टिकवून ठेवला आहे. त्यामुळे मालीकेतील प्रत्येक कलाकारांवर प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आहे. आणि या सर्वच कलाकारांना त्यांनी साकारलेल्या पात्राच्या नावावरूनच जास्त ओळखले जाते ही ह्या मालिकेची खासीयत म्हणावी लागेल. मात्र खेदाची बाब म्हणजे या मालिकेतील नट्टू काकाची भूमिका गाजवणारे अभिनेते “घनश्याम नायक” यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी आज ३ ऑक्टोबर रोजी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या अशा जाण्याने मालिकेतील कलाकार आणि तमाम चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

घनश्याम नायक हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय होते त्यांनी बॉलिवूडची अनेक गाजलेले चित्रपट अभिनित केले आहेत. बेटा, बरसात, मासुम, तिरंगा, आशिक आवारा, इना मीना डिका, क्रांतिवीर, बरसात, आंदोलन, चाहत यासारख्या चित्रपटातून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. दिल मिल गये, साराभाई vs साराभाई , खिचडी सारख्या मालिकेतून त्यांनी विनोदी तसेच सहाय्यक भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कॅन्सरचे निदान झाल्यावर त्यावर उपचार करण्यात आले होते. उपचार करून पुन्हा तितक्याच जोशाने ते तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेतून नट्टू काकांची भूमिका साकारू लागले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अचानक खालावू लागली. त्यामुळे ताबडतोब त्यांना मालाड येथील दवाखान्यात दाखल करावे लागले होते. डॉक्टरांच्या उपचाराला त्यांचे शरीर साथ देत नव्हते मात्र आज अखेर ५. ३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. कर्करोगाशी त्यांची ही झुंज आज मात्र अयशस्वी ठरली. घनश्याम नायक यांनी गुजराथी रंगभूमिपासून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती. छोट्या मोठ्या मिळेल त्या भूमिका साकारत असताना तारक मेहता का उलटा चश्मा मालिकेत त्यांना नट्टू काकांचे पात्र साकारण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ती लीलया पार पाडली. मी एक कलाकार आहे आणि माझी कला साकारत असतानाच मला मरण यावे अशी त्यांची अखेरची ईच्छा होती. नट्टू काका यांच्या जाण्याने मालिकेतील कलाकार खूपच भावुक झाले आहेत त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत. घनश्याम नायक यांना आमच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली!