तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे देशभरात असंख्य चाहते आहेत. २००८ साली सुरू झालेली ही मालिका आजतागायत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र आता अंतर्गत वादामुळे हा शो बंद होईल अशा स्वरूपाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. शोचे सर्वेसर्वा असित मोदी आणि तारक मेहता ची भूमिका गाजवणारे दिलीप जोशी यांच्यात कडाक्याचं भांडण झाली अशी एक बातमी पसरवली जात आहे. दिलीप जोशी यांनी थेट असित मोदी यांची कॉलरच पकडली असे या बातमीत म्हटले गेले. यामुळे तब्बल १६ वर्षे सुरू असलेला हा शो बंद होणार अशी चर्चा सूरु झाली आहे. पण आता या बातमीवर स्वतः दिलिप जोशी यांनीच मौन सोडलेलं पाहायला मिळत आहे.
कडक्याचं भांडण, कॉलर पकडली, शो बंद होणार या सगळ्या बातम्यांबद्दल दिलीप जोशी म्हणतात की, “या सगळ्या ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्याबद्दल मला खुलासा करायचा आहे. माझ्या आणि असित मोदी यांच्या भांडणाबद्दल जे बोललं जातंय या सगळ्या अफवा आहेत. मला स्वतः लाच या बातम्या पाहून धक्का बसला आहे. तारक मेहता हा शो माझ्या असंख्य चाहत्यांसाठी खूप खास आहे. त्यामुळे या अफवांमुळे माझे चाहतेही नाराज झाले आहेत. खूप वाईट वाटतं की ज्या शोने इतके वर्ष या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे त्याच्या बद्दल निगेटिव्हीटी पसरवली जात आहे. या सगळ्या अफवा आहेत यामुळे शो, असित भाई आणि माझ्याबद्दल बदनामी पसरवली जात आहे. अशा गोष्टी वारंवार समोर येत असल्याने मी हताश झालोय.
काहींना हा शो लोकप्रिय होत असल्याचे बघवत नाही म्हणून अशी बदनामी केली जात आहे “. असे स्पष्टीकरण दिलिप जोशी यांनी दिलं आहे. तारक मेहता हा शो गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनात स्थान बनवून आहे. पण मधल्या काळात असित मोदींसोबत झालेल्या वादामुळे अनेक कलाकारांनी हा शो सोडला होता. पण आता मुख्य भूमिकेत असलेले दिलीप जोशी यांनीच असित मोदींसोबत जोरदार भांडण केलं अशी अफवा पसरवली जात आहे. या अफवेनंतर शो एक्झिट घेणार अशीही बातमी पसरू लागल्याने दिलिप जोशी यांना मौन सोडावं लागलं आहे.