गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील स्वर्णव चव्हाण या अवघ्या ४ वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. नेटकऱ्यांनी देखील सहानुभूती दर्शवत ही बातमी सगळीकडे पसरवली होती. ११ जानेवारी रोजी बाणेर येथील इंदुपार्क सोसायटीच्या जवळून स्वर्णव त्याच्या डे केअर असलेल्या मुलासोबत जात होता. तिथूनच एका व्यक्तीने येऊन स्वर्णवला उचलून नेले होते. त्यानंतर चतुशृंगी पोलीस ठाण्यात स्वर्णवच्या अपहरणाची फिर्याद दाखल केली होती. सीसीटीव्ही फुटेजवरील त्या इसमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.

स्वर्णव ज्या गाडीतून जात होता त्या गाडीचा नंबर देखील फोटोमध्ये अगदी स्पष्ट दिसत होता. मात्र तरीदेखील तो सापडत नसल्याने अधिक चिंता व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान स्वर्णव सुखरूप घरी यावा म्हणून त्याचे वडील डॉ सतीश चव्हाण यांनी पाहिजे ती किंमत देण्याची तयारी दर्शवली होती. गेले आठ दिवस जवळपास ३०० ते ३५० पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा फाटा त्याच्या शोधाच्या प्रयत्नात होता. अतिशय गुप्तता बाळगून चतुशृंगी पोलिसांना अखेर स्वर्णवचा ठावठिकाणा लागला. स्वर्णव सुखरूप असून तो त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला असून तो इथे कसा पोहोचला आणि यामागे नेमका कोणाचा हात होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्वर्णवला उचलून नेणारा व्यक्ती देखील कोण होता हे देखील अद्याप कळलेले नाही. मात्र स्वर्णव सुखरूप असल्याचे समजताच सर्वांनी निश्वास टाकलेला पाहायला मिळतो आहे. या कार्यात गुप्तता बाळगून असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.