स्वर्णवच्या अत्याचे अपघातात निधन स्वर्णव घरी सुखरूप पोहोचला मात्र दुसरीकडे चव्हाण कुटुंबावर पसरली शोककळा

काल दुपारी म्हणजेच १९ जानेवारी रोजी स्वर्णव चव्हाण हा ४ वर्षाचा चिमुरडा सापडल्याने आणि तो सुखरूप घरी पोहोचल्याने सर्वच स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. गेल्या आठ दिवसांपासून स्वर्णवला एका अज्ञात इसमाने बाणेर बालेवाडी येथून उचलून नेले होते. दरम्यान मुलाला सुखरूप घरी परतण्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली होती. अखेर काल त्या अज्ञात इसमाने पुनावळे येथील एका इमारतीच्या समोर नेऊन सोडले. इमारतीचे संरक्षक दादाराव चव्हाण यांनी स्वर्णवच्या बॅगेवरील पालकांच्या फोन नंबरवर संपर्क साधला आणि स्वर्णव पालकांकडे सुखरूप सुपूर्त केला. या कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या दादाराव चव्हाण यांचे कौतुक केले जात आहे तर या कामगिरीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा देखील सज्ज केली होती त्यांचे देखील नेटकऱ्यांनी आभार मानले आहेत.

मात्र चव्हाण कुटुंबात हा आनंदाचा क्षण अनुभवत असतानाच एक दुःखद घटना घडली आहे. स्वर्णव मिळाला म्हणून त्याची आत्या सुनीता संतोष राठोड या नांदेड हुन काल रात्रीच पुण्याला यायला निघाल्या होत्या. मात्र प्रवासात त्यांच्या गाडीला नगर रोडवर भीषण अपघात झाला आणि या अपघातात त्यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. सुनीता राठोड या ३६ वर्षांच्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे पती संतोष राठोड आणि त्यांची दोन मुलं समर राठोड आणि अमन राठोड (अनुक्रमे वय वर्षे १४ आणि ८ ) हे ही त्यांच्यासोबतच होते. सुनीता राठोड यांची दोन्ही मुलं गंभीररीत्या जखमी झालेली आहेत. तर त्यांचे पती संतोष राठोड यांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या दोन्ही मुलांवर पुण्यातील बाणेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर दुखापतीमुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. एका क्षणी स्वर्णव सापडल्याचा आनंद सर्वांना होत असतानाच मात्र दुसऱ्या क्षणी चव्हाण कुटुंबावर मोठी शोककळा पसरलेली पाहायला मिळते आहे. स्वर्णवच्या आत्याच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.