कलर्स मराठीवरील स्वामीनी या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री सानिका बनारसवाले हिचा ९ डिसेंबर २०२१ रोजी ऋषभ कटारिया ह्याच्यासोबत विवाह संपन्न झाला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या निसर्गाच्या सानिध्यात अगदी मोजक्याच मित्रमंडळींसमवेत त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. स्वामिनी या मालिकेत सानिका बनारसवाले हिने जानकीबाईची भूमिका निभावली होती. तिने साकारलेल्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. सध्या स्टार प्रवाहवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून ती मेघनाची भूमिका साकारत आहे.

अभिनेत्री सानिका बनारसवाले हीचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाईचा. वाईमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. खेळी मेळी सारख्या नाटकातून ती रंगभूमीवर चमकली होती. नकळत सारे घडले या मालिकेतून सानिकाचे छोट्या पडद्यावर पदार्पण झाले होते. अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, स्वामिनी, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून तिला महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली. स्वामिनी मालिकेमुळे सानिकाला अमाप प्रसिद्धी मिळाली होती याच मालिकेतून ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. शाळेत असल्यापासूनच सानिका विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग घ्यायची. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर रंगभूमीशी ती जोडली गेली. काही जाहिरातींसाठी तिने मॉडेलिंग देखील केलं आहे. तिने फिल्ममेकिंग आणि फोटोग्राफीचे देखील धडे गिरवले आहेत. ऋषभ कटारिया याच्याशी तिची खूप आधीपासूनच ओळख होती.

त्यांच्या या कित्येक वर्षांच्या मैत्रीचे आता लग्नात रूपांतर झाले आहे. ऋषभ कटारिया हा पुण्यात वास्तव्यास आहे. त्याने सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण घेतले असून स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे. लग्नागोदर या दोघांचे प्रिवेडिंग फोटोशूट करण्यात आले होते. त्यानंतर ९ डिसेंबर २०२१ रोजी मोठ्या थाटात लग्न पार पडले. लग्नाचे फोटो सानिकाने दोन दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. मोजक्याच मित्रमंडळींना आमंत्रित करून अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला होता. शेवटी एक स्वप्न पूर्ण झालं…ज्या दिवसाची आम्ही गेले कित्येक वर्षे वाट पाहत होतो, ते शब्दात व्यक्त नाही करू शकत…असे म्हणत तिने ऋषभ कटारियासोबत लग्न झालं असल्याचे जाहीर केले आहे. सानिका आणि ऋषभ या नवदाम्पत्यास मनःपूर्वक शुभेच्छा…