
मराठी बिग बॉसच्या ५ व्या सिजनला सुरुवात झाल्यापासूनच या शोची सगळीकडे चर्चा झाली. दरम्यान या शोमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी येणार याची उत्सुकता लागून राहिली होती. रविवारी पार पडलेल्या ग्रँड प्रीमियच्या सोहळ्यात १६ स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. या स्पर्धकांमध्ये बरेचसे सेलिब्रिटी हे सोशल मीडिया स्टार आहेत तर काही मालिका सृष्टीतील कलाकार, राजकीय आणि कीर्तनकार यांनीही या शोमध्ये सहभाग दर्शवला आहे. त्यामुळे मराठी बिग बॉसचा शो रंजक ठरेल अशी आशा आहे. काल पहिल्याच दिवशी वर्षा उसगावकर यांनी आवरायला वेळ घेतला त्यामुळे नीक्की तांबोळी त्यांच्यावर चिडलेली पाहायला मिळाली. तर घरात पाणी बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

नाश्ता मिळवण्यासाठी या सदस्यांना एक मोठ्या टास्कला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर निर्णय घेऊ न शकणारा सदस्य म्हणून सूरज चव्हाणचे नाव घेण्यात आले. तीन नावांमध्ये आपले नाव सगळ्यांनी सुचवल्याने सूरज सुरुवातीला गोधळलेला पाहायला मिळाला. पण हळूहळू तो एंटरटेन करून प्रेक्षकांचे मन नक्कीच जिंकेल असा विश्वास आहे. सूरज चव्हाण हा रीलस्टार आहे. टिकटॉकमुळे तो सोशल मीडियावर लोकप्रिय झाला होता. पण मध्येच टिकटॉकला बॅन करण्यात आले तेव्हा सुरजने पर्यायी मार्ग शोधून तिथेही लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सुरजने त्याला मिळत असलेल्या मानधनाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. सदस्यांसोबत बोलत असताना सूरज म्हणतो की, “टिकटॉकच्यावेळी मला एका दिवसाला रिबीन कापायचे ८० हजार मिळायचे. आताही मला दिवसाला ३० ते ५० हजार रुपये मिळतात”, सूरजने हा खुलासा करताच समोर असलेली योगिता चव्हाण मात्र त्याचे हे मानधन ऐकून आश्चर्यचकित झाली.

पुढे सूरज असेही म्हणाला की, ” मला जेव्हा हे पैसे मिळायचे तेव्हा मला अनेकांनी फसवलं होतं. माझ्या बहिणी मला समजवायच्या की तू सुधर आम्हाला बरं वाटेल तेव्हा मी त्या गोष्टीचा विचार करायला लागलो”. सुरज चव्हाण हा रीलस्टार आहे. खेडेगावात त्याचे संगोपन झाल्याने बिग बॉसचे आलिशान घर पाहून तो आश्चयचकीत झाला. बिग बॉसच्या घरातील टॉयलेटच्या वापराबद्दलही तो अभिज्ञ असलेला पाहायला मिळाला. दार कसं उघडायचं हे त्याला वर्षा उसगावकर यांनी सांगितलं. तर दात घासायला पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याचा पेला घेतो म्हणून बिग बॉसकडे तो माफी मागताना दिसला. त्याचा हा साधासुधा स्वभाव प्रेक्षकांना आवडेल का? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.