सुंदरा मनामध्ये भरली ही मलिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येकच मालिकेत कलाकारांच्या सुट्ट्या आणि इतर काही गोष्टींमुळे मूळ कथेत बदल केला जातो. तर आता या मालिकेच्या कथेत देखील पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील एका अभिनेत्रीला मोठी दुखापत झाली आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत जयश्री म्हणजेच लतिकाची आई ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. अभिनेत्री पूनम चौधरी जयश्री हे पात्र साकारत आहेत. त्यांच्या गाडीचा एक अपघात झाला आहे.

यामुळे त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. त्यासाठी त्यांना डॉक्टरांनी अधिक विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पूनम यांचा हात फॅक्चर झाला आहे. मात्र तरी देखील त्या काही दिवस शूटिंगला येत होत्या. वेदना असह्य होत असल्याने त्यांनी मालिकेतून काही दिवसांची सुट्टी घेतली आहे. यावेळी त्यांनी काही शुटींग पूर्ण केले आहेत पण आता त्यांची तब्येत ठीक होत नाही तोवर मालिकेत आणखीन काही ट्विस्ट येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या मालिकेतील आणखीन एका अभिनेत्रीला दुखापत झाली होती. काही दिवसांपासून लतिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक हिला देखील दुखापत झाली होती. तिचा देखील हात फॅक्चर झाला होता. त्यामुळे तिने मालिकेतून थोडा काळ सुट्टी घेतली होती. अशात आता एकाच मालिकेतील तेही आई आणि मुलीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबरोबर असं काही होत आहे त्यामुळे प्रेक्षक चिंतेत आहेत. तसेच अनेक जण पूनम यांना लवकर ठीक वाटावे अशी प्रार्थना देखील करत आहेत. अनेक चाहते आणि कुटुंबीय देखील त्या कधी ठीक होतील याची वाट पाहत आहेत.

त्यांच्या अभिनयातील कारकीर्दीविषयी बोलायचं झाल्यास त्यांनी अनेक राज्यस्तरीय नाटकांसाठी दिग्दर्शन आणि निर्मितीचे काम केले आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि स्नेहा पाटील या दोघींना त्या त्यांच्या प्रेरणास्थानी मानतात. काळी माती, कास, ट्रिपल सीट, तू अशी जवळी रहा, ग्रहण, यंग्राड, जाडुबाई जोरात, घुमा, चार दिवस प्रेमाचे असे अनेक चित्रपट मालिका तसेच नाटकी यांमधून त्यांनी आपला अभिनय प्रेक्षकांसमोर सादर केला आहे. त्यांच्या अभिनयातील कौशल्याने त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आल आहे. आता लवकरात लवकर त्या बऱ्या व्हाव्यात अशीच सर्वजण इच्छा बाळगत आहेत. लवरच त्या बऱ्या होऊन पुन्हा नव्याने पाहायला मिळतील हीच सदिच्छा…