सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी ट्रोल होत असतात तर काहींना त्यांच्या फॅन्सकडून नाहक त्रासही सहन करावा लागतो. मात्र सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील मिस नाशिक म्हणजेच अभिनेत्री पूजा पुरंदरे हिला एक वेगळाच धक्कादायक अनुभव आला आहे. या अनुभवामुळे तिने चक्क पोलीस ठाण्यातच धाव घेतली आहे. पूजा पुरंदरे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मालिका सृष्टीत कार्यरत आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे तिला चांगली प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतून तिने काही काळासाठी ब्रेक घेतला त्यावेळी मालिकेच्या चाहत्यांनी तिला खूपच मिस केले होते. खर तर अशा प्रसिद्धीचा कलाकारांना फायदाही होतो तर काही दृष्ट्या त्यांना नाहक त्रासही सहन करावा लागतो.

गेल्या काही दिवसांपासून पूजाला गैरवर्तन करणाऱ्या संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटवरून मेसेजेस आणि पोस्ट द्वारे टॅग करण्यात आले होते. जे खूप निंदनीय, अपमानास्पद आणि धमकीवजा ईशारा स्वरूपात होतं. मात्र या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केले कारण मी ज्या क्षेत्रात काम करते तिथे ट्रोल होणं हे स्वाभाविक आहे इथे प्रत्येक जण कधी ना कधी या ट्रोलर्सना सामोरा गेलेला आहे. परंतु काल जे माझ्याबाबत घडलं त्यामुळे मी खूप नाराज झाले आहे आणि मी ठरवलं यापुढे अशा गोष्टींना सहन नाही करायचं. त्या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी त्या व्यक्ती विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. सोबतच पूजाने यापुढे ट्रोलिंग सहन केले जाणार नाही असेही म्हटले आहे. कोणी ट्रोल केल्यास त्याविरोधात आवाज उठवा असेही तिने सर्वांना सांगितले आहे. एखादी गोष्ट आपल्या विरोधात बोलली जाते त्याला सुरुवातीला प्रत्येकजण दुर्लक्षित करतो मात्र जेंव्हा ती गोष्ट नाहक त्रास देणारी ठरते तेव्हा त्याविरोधात आवाज उठवणे उचित ठरते. असाच प्रकार पूजाच्या बाबतीत घडला आहे. सायबर अब्युजिंग सारख्या गोष्टी प्रत्येक कलाकार फेस करत असतो मात्र त्याविरोधात योग्य वेळी तक्रार दाखल केल्यास या गोष्टींना आळा निश्चितच बसेल.