एखाद्या अभिनेत्याच्या किंवा अभिनेत्रींच्या मुला मुलींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण काही नवी गोष्ट नाही. अनेक कलाकारांची मुले आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयक्षेत्रात येताना पाहायला मिळतात. सहसा कोणी स्वतःच्या पायावर वशिलेबाजी न करता एखादा छोटासा व्यवसाय करताना सहसा पाहायला मिळत नाही. पण हे समीकरण आता बदलेलं पाहायला मिळतंय. सुंदरा मनामध्ये भरली ह्या मालिकेतील एका कलाकाराच्या मुलाने स्वतःच्या जिद्दीने ह्या महामारीच्या काळातही त्याचा स्वतःचा छोटासा व्यवसाय करताना पाहायला मिळतो. त्याबद्दल सविस्तर जाणून घेतल्यावर तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल..

सुंदरा मनामध्ये भरली ह्या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेत लतीकाचे वडील म्हणजेच बापुची भूमिका साकारणारे ‘उमेश दामले’ ह्यांना तुम्ही ओळखतच असाल. उमेश दामले हे एक उत्कृष्ठ कलाकार आहेत. त्यांनी मुळशी पॅटर्न, मोगरा फुलला,आजोबा वयात आले, रणांगण, मितवा,जावई विकत घेणे आहे, नकळत सारे घडले, एक झुंज वाऱ्याशी अशा चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. उमेश दामले यांचा मुलगा मानस दामले हा अभिनयक्षेत्रात न येता त्याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. अभिनेते उमेश दामले यांचा मुलगा मानस दामले पुण्यात “दामले इडली सेंटर” चालवत आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत भरतनाट्य मंदिराजवळ ह्या सेंटरची स्थापना त्यांनी केली आहे. मानसने पाककला शास्त्र विषयाची पदवी मिळवली होती. परंतु यात यश मिळेल की नाही याची शाश्वती त्याला नव्हती त्यामुळे पुढे जाऊन त्याने आयटी क्षेत्रात नोकरी करण्याचे ठरवले. गलेलठ्ठ पगार मिळवत असताना या नोकरीतून मानसिक समाधान मात्र त्याला मिळत नव्हते. मग पुन्हा एकदा पाककलेकडे वळण्याचे धाडस केले. स्वतःचा व्यवसाय करून यातच आपले करिअर करायचे असे ठरवले.

सुरुवातीला व्यवसाय करण्याला सगळीकडून विरोध होऊ लागला. मात्र हा विरोध डावलून व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचे धाडस केले. प्रथमतः पदार्थांची चव आणि ग्राहकांची तृप्ती यावर भर देऊन आपले पदार्थ स्वादिष्ट कसे बनतील याचा अभ्यास केला. त्याने बनवलेली चटणी आणि विशिष्ट पद्धतीने बनवलेले सांबार खवय्यांना आकर्षित करणारे ठरले. दूर दूरहून लोक त्याच्या इडलीची चव चाखायला हमखास येतात. विशेष म्हणजे हा एखाद्या अभिनेत्याचा मुलगा आहे असं कोणाला माहीतही नसेल. पण म्हणतात ना एखाद्या व्यवसायात तुम्ही तरबेज झालात कि लोक आपोआप तुमच्याकडे खेचले जातात. असच काहीस मानसच्या बाबतीत घडताना पाहायला मिळतं. स्वतः बनवलेली इडली लोकांना खायला घालताना त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो हेच त्याच्या व्यवसायातून त्याला मिळालेलं समाधान असल्याचं समजत. दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा छोटासा व्यवसाय केलेला कधीही चांगला असं आपण ऐकतो पण मानसने ते करून दाखवलं. मानस दामले ह्यांना त्यांच्या व्यवसायात असच यश मिळत राहो आणि खवयांना असाच आस्वाद मिळत राहो अशी सदिच्छा..