serials

सुमित पुसावळेचा मालिकेतून काढता पाय…१७०० भागानंतर बाळू मामाच्या भूमिकेत दिसणार हे प्रसिद्ध अभिनेते

कलर्स मराठी वरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच या मालिकेने १७०० भागांचा टप्पा पार करत यशाची वाटचाल सुरूच ठेवली आहे. पण आता मालिकेत मोठा बदल घडून आला आहे कारण बाळू मामाची भूमिका साकारणारा सुमित पुसावळे याने या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सुमितची वर्णी लागली आहे. या मालिकेत त्याला प्रमुख भूमिकेसाठी विचारणा झाली होती त्यामुळे त्याने बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतून कायमची एक्झिट घेतली आहे. खरं तर बाळू मामाच्या भूमिकेने सुमितला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली, या भूमिकेसाठी त्याला गावागावात ओळखले जाऊ लागले. बाळू मामाची भक्त त्याच्याकडे त्याच श्रद्धेने पाहू लागले होते.

prakash dhotre in balumama serial
prakash dhotre in balumama serial

भक्तांकडून अनेक अद्वितीय अनुभव त्याला मिळाले होते त्यामुळे ही भूमिका त्याने प्रत्यक्षात जगली असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मालिकेतून काढता पाय घेण्यासाठी सुमित थोडासा धजावला होता. पण एका कलाकारासाठी चांगल्या संधी शोधत राहणे तेवढेच गरजेचे असते. याचसाठी त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. पण सुमितने निभावलेल्या बाळू मामाची छाप अजूनही प्रेक्षकांच्या मनात रुजलेली आहे त्यामुळे या भूमिकेसाठी आता तेवढ्याच तगड्या अभिनेत्याची गरज होती. ही गरज आता ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे पूर्ण करणार हे आता स्पष्ट झाले आहे. नुकतीच प्रकाश धोत्रे यांनी या व्यक्तिरेखेची धुरा सांभाळलेली पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना आता बाळू मामाच्या भूमिकेत प्रकाश धोत्रे दिसणार आहेत. ही भूमिका ते सुमित इतकीच उत्तम निभावतील असा विश्वास आहे. कारण प्रकाश धोत्रे यांनी आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून दमदार भूमिका साकारलेल्या आहेत.

Balumamachya Navan Changbhala new actor prakash dhotre
Balumamachya Navan Changbhala new actor prakash dhotre

प्रकाश धोत्रे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्याचे. चितळी या गावात त्यांचे बालपण गेले. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करून त्यांनी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स क्षेत्रात फॉर्मर ऑफिसर म्हणून काम केले. याच जोडीला त्यांनी अभिनयाची आवड देखील जपली. १४० हुन अधिक चित्रपट, ५० पेक्षा जास्त मालिका आणि हिंदी चित्रपट मालिकांमधूनही त्यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सुंदरा मनामध्ये भरली, बापू बिरु वाटेगावकर, सासरची साडी, घाशीराम कोतवाल, ढाण्या वाघ अशा अनेक कलाकृतीतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अशातच आता बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतून त्यांना बाळू मामाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ही भूमिका ते उत्तम निभावतील यात मुळीच शंका नाही. या दमदार भूमिकेसाठी प्रकाश धोत्रे यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button