सुख म्हणजे नक्की काय असतं या लोकप्रिय मालिकेत सध्या शालिनी कोल्हापूरमध्ये होणाऱ्या मिसेस ब्युटी काँटेस्टमध्ये सहभाग दर्शवणार आहे. ह्याच सौंदर्य स्पर्धेत गौरीनेही सहभाग घ्यावा आणि ही स्पर्धा तिने जिंकावी असा आग्रह जयदीपने धरला आहे. परंतु स्पर्धेमध्ये माई गौरीला सहभाग घेऊ देतील की त्यावर त्या आक्षेप घेतील हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे ही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. याच कारणास्तव मालिकेत एक नव्या पात्राची एन्ट्री होत आहे. शालिनीला ही सौंदर्य स्पर्धा जिंकता यावी म्हणून तिच्या मदतीसाठी “सँडीची” एन्ट्री होत आहे. ही सँडी नेमकी आहे तरी कोण हे जाणून घेऊयात…

शालिनीला मिसेस कोल्हापूरच्या सौंदर्य स्पर्धेच्या तयारीसाठी कसे बोलावे लागणार, कसे चालावे लागणार हे शिकवण्यासाठी सँडीचे पात्र मालिकेत दाखल होत आहे. हे पात्र साकारले आहे अभिनेत्री “नयना मुके” हिने. नयना मुके ही हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. शिवाय भरतनाट्यमचेही प्रशिक्षण तिने घेतले आहे. अनेक मोठमोठ्या मंचावरून तिने आपल्या नृत्याची अदाकारी सादर केली आहे. फायनल डिसीजन, सेक्स ड्रग्ज अँड थेटर, अनवट, सुपर्ब प्लॅन यासारख्या चित्रपट आणि सिरीजमधून तिने अभिनय साकारला आहे. शिवाय मोठमोठया ब्रॅण्डसाठी मॉडेलिंगही तिने केले आहे. कलर्स मराठीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ या लोकप्रिय मालिकेतून तिने लक्ष्मी मातेची भूमिका साकारली होती. बऱ्याच प्रतीक्षेनंतर नयना पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळलेली पाहायला मिळत आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून ती सँडीची भूमिका साकारत आहे. सँडीचे पात्र शालिनीला सौंदर्य स्पर्धेत कसे चालायचे, कसे वागायचे हे शिकवणार आहे. यासोबतच सँडीचे पात्र गौरीला देखील मदत करेल की तिच्या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्यावर विघ्न आणेल हे ही पाहणे रंजक होणार आहे. सँडीची ही भूमिका छोटीशी जरी असली तरी एका लोकप्रिय मालिकेतून नयना पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे ही बाब तिच्यासाठी खूप खास ठरणार आहे. नयना मुके हीला सँडीच्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा..