
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे. या मालिकेतील शालिनीच्या पप्पांची भूमिका अभिनेते अरविंद धनु यांनी साकारली होती. अरविंद धनु यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला होता त्यामुळे त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. मात्र ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आल्याचे समोर आले आहे. अरविंद धनु हे ४७ वर्षांचे होते. सोमवारी २५ जुलै रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. अरविंद धनु हे चित्रपट मालिका अभिनेते होते. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली होती. विरोधी भूमिकेत असलेल्या शालिनीचे पप्पा अशी त्यांची भूमिका असली तरी ते शालिनीला वेळोवेळी जाब विचारत होते.

त्यांच्या असण्याने शालिनीच्या कटकारस्थानाला काही काळापुरता आळा बसला होता. लेक माझी लाडकी, तराफा, मेरे साईं, रूपांतर, अहो स्वामी तुम्ही आहात ना!, एक होता वाल्या अशा चित्रपट मालिकेतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. काही वेबीसीड्स साठीही त्यांनी काम केले होते. अहो स्वामी तुम्ही आहात ना मधून त्यांनी स्वामी समर्थांची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना चांगली लोकप्रियता मिळाली. छोट्या मोठ्या भूमिका साकारत असताना अरविंद धनु यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत एन्ट्री केली. शालिनी ही त्यांची मुलगी, तिच्या कारस्थानांची जाणीव त्यांना झाली तेव्हा त्यांनी तिला समज दिला होता. त्यावेळी हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले होते. अरविंद धनु यांच्या निधनाने कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी सृष्टीतील कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.