सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत लवकरच एक मोठा बदल घडून येणार आहे. या मालिकेत सुरुवातीपासूनच देवकीचे पात्र विरोधी भूमिका दर्शवताना दिसले आहे त्यामुळे ही भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे गेली आहे. हीच तिच्या सजग अभिनयाची खरी पावती ठरली आहे मात्र आता मीनाक्षी सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका काही काळासाठी सोडणार असल्याचे निश्चित झाले आहे. मीनाक्षी राठोड प्रेग्नन्सीच्या कारणास्तव मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेणार आहे. काही दिवसांपूर्वी मिनाक्षीने प्रेग्नंन्ट असल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.

प्रेग्नन्सीच्या काळातही तिने मालिकेत काम करणे चालूच ठेवले होते त्यावरून तिचे मोठे कौतुक करण्यात येत होते. मात्र आता येणाऱ्या बाळाच्या सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या कारणास्तव तिने मालिकेतून काढता पाय घेतला आहे. मीनाक्षी राठोड आता काही दिवस या मालिकेत दिसणार नसली तरी तिने साकारलेली देवकीची भूमिका मालिकेत सक्रिय राहणार आहे. त्या भूमिकेसाठी आता एका नायिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. देवकीच्या भूमिकेत आता भक्ती रत्नपारखी ही मालिका निभावताना दिसणार आहे. मालिकेच्या सेटवर भक्तीचे जोरदार स्वागत करण्यात आले असून अवघ्या काही दिवसातच ती आता या सेटवर छान रुळलेली पाहायला मिळत आहे. भक्तीसाठी देवकीची भूमिका आव्हानात्मक असणार आहे कारण हे पात्र मिनाक्षीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात उतरवले होते. मिनाक्षीच्या जागी आता भक्ती देवकीची भूमिका साकारणार असल्याने प्रेक्षकांना थोडेसे जड जाणार आहे परंतु येत्या काही दिवसातच भक्ती तिच्या अभिनयाने मालिकेच्या प्रेक्षकांचा विश्वास नक्कीच जिंकणार आहे.

भक्ती रत्नपारखी हिने बहुतेक मालिकांमधून विनोदी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. झी मराठीवरील अग्गबाई सासुबाई तसेच अग्गबाई सुनबाई या मालिकेतून मॅडीची भूमिका गाजवली होती. महाराष्ट्राचा सुपरस्टार, फु बाई फु या शोमधून भक्तीने वेगवेगळे स्किट सादर केले होते. मराठी हिंदी चित्रपट तसेच मालिकांमधून भक्तीला अभिनयाची संधी मिळत गेली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत तिला मिनाक्षीने निभावलेले देवकीचे पात्र साकारण्याची संधी मिळाली आहे. कटकरस्थान करणारी देवकीची भूमिका भक्ती आपल्या अभिनयाने चोख बजावेल अशी खात्री आहे. या भूमिकेसाठी भक्ती रत्नपारखी हिला मनःपूर्वक शुभेच्छा.