सप्तपदीला घाईगडबडीत ८ फेऱ्या झाल्या म्हणून माझ्या ताईने ….सुकन्या कुलकर्णी यांच्या लग्नाची मजेशीर गोष्ट
सुकन्या कुलकर्णी अभिनित बाई गं हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने कलाकारांची टीम विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका अशाच मुलाखतीत सुकन्या कुलकर्णी यांनी त्यांच्या लग्नाची एक गंमत शेअर केली आहे. सुकन्या कुलकर्णी आणि संजय मोने यांनी प्रेमविवाह केला होता. एका नाटकात या दोघांनी एकत्रित काम केले होते. हळूहळू त्यांच्यात ओरम जुळून आले. संजय मोने यांनी रात्री उशिरा भर पावसात जाऊन सुकन्या कुलकर्णी यांना लग्नाची मागणी घातली होती. पण त्यांचं हे लग्न टिकेल की नाही यावर इंडस्ट्रीतील सगळ्यांनाच शंका होती. कारण संजय मोने यांचा स्वभावगुण सगळ्यांना चांगलाच परिचयाचा होता.
या लग्नाची खास गंमत सांगताना सुकन्या कुलकर्णी म्हणतात की, ” या इंडस्ट्रीत आमच्यासाठी बापमाणुस तो म्हणजे विनय आपटे. ‘निखारा पदरात घेऊन लग्न करणार आहेस विचार कर.’ असा मोडता विनय आपटे यांनी घातला होता. इंडस्ट्रीतून सगळ्यांनी हे लग्न करू नकोस म्हणून सल्ले दिले होते. त्यांना कोणालाच वाटलं नव्हतं की आमचं लग्न २५ वर्ष टिकेल. साधे २५ दिवस ही टिकेल की नाही याबाबत त्यांना शंका होती. मुळात लग्न लागताना बाहेर पोलीस उभे होते. कारण तो कधीही पळून जाऊ शकतो हे आम्हाला माहीत होतं , त्याने मला सांगितलं होतं की एका तासात विधी आटोपणार आहेत का नाहीतर रजिस्टर लग्न कर. पण मला रजिस्टर लग्नाला अजिबात इंटरेस्ट नव्हता. एक तास ५ मिनिटं झाली तरी मी निघून जाईल अशी तंबीच संजय कडून मिळाली होती. तेवढ्या वेळात सगळे महत्वाचे विधी पटापट आटोपून घे मग नंतर काहीही येऊ दे . या अटीमुळे सप्तपदीला त्याच्या स्पीडने झपझप फेऱ्या मारल्या.
या सगळ्या गोंधळात माझ्याच ताईने आठ फेऱ्या झाल्यात म्हणून आम्हाला थांबवलं. आणि आता एक उलटी फेरी मारा म्हणून मागे फिरायला लावलं. ” सुकन्या कुलकर्णी यांच्या या खुलाशावर सगळ्यांनी मात्र आश्चर्य व्यक्त केलं. कारण असं लग्न होऊ शकतं का यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता. खरं तर सुकन्या कुलकर्णी आणि संजय मोने यांचं लग्न झालं तेव्हा फारसा तामझाम काही पाहायला मिळाला नव्हता. त्यांच्या लग्नात त्यांनी एकही फोटो काढला नाही अशी खंत त्या व्यक्त करतात. अशाच एका मालिकेत एकत्रित काम करताना त्यांचा एकत्र फोटो काढण्यात आला तेव्हा हाच फोटो त्यांनी लग्नातला समजून अजूनही जपून ठेवला आहे . त्यांच्या लग्नात तर वऱ्हाडी मंडळींना भाकरी भाजी असं साधं जेवण खायला देण्यात आलं होतं हे मेन्यू संजय मोने यांनीच ठरवून दिले होते, अशी या लग्नाची ही एक आठवण मुलाखतीत काढण्यात आली.