सुधीर भट यांच्या मुलाने मुंबईत सुरू केला हॉटेल व्यवसाय… उत्तम चवीसाठी पुण्यातील शाखांना तब्बल १० वेळा सन्मानित केलंय

मराठी सृष्टीला उत्तम नाट्य निर्माते लाभले त्यातीलच एक म्हणजे सुधीर भट होय. नाट्य निर्मिती क्षेत्रात यश मिळो वा अपयश अशा दोन्ही गोष्टींना ते हसत हसत सामोरे गेले. बऱ्याचशा नाटकांमुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला मात्र काही निवडक नाटक १००० प्रयोग करताना दिसले. लोकांना नाटक पाहायला नाट्यगृहात कसं आणायचं याचं उत्तम गणित त्यांच्याकडे होतं. त्यामुळे सर्वात जास्त नाट्य निर्मिती करण्यामागे सुधीर भट यांचा हातखंडा राहिला. काही प्रमाणात त्यांच्यावर टीकाही झाली पण त्याकडे त्यांनी कानाडोळा केला. गोपाळ अल्गेरि यांना सोबत घेऊन सुयोग या नाट्यसंस्थेची त्यांनी स्थापना केली होती. या एकाच नाट्यसंस्थेतून अनेक नाट्य निर्मिती करण्याचा रेकॉर्ड त्यानी केला होता.

देश विदेशात मराठी नाटक नेण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या मुळे नाट्यसृष्टिला सुगीचे दिवस आले असे म्हटले जात होते. १४ निव्हेंबर २०१३ साली सुधीर भट यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यावेळी अवघ्या मराठी सृष्टीने हळहळ व्यक्त केली होती. त्यांच्या निर्मिती संस्थेची जबाबदारी मुलगा संदेश भट सांभाळत आहेत. यासोबतच त्यांनी हॉटेल व्यवसाय क्षेत्रातही उडी घेतली आहे. पुण्यात फिश करी राईस या नावाने त्यांचे सी फूड मिळणारे हॉटेल आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर दादर येथील कोहिनुर स्क्वेअर मॉल येथे त्यांनी “फिश करी राईस” ची शाखा सुरू केली आहे. या हॉटेलच्या उदघाटनावेळी मराठी सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली होती. जानेवारी महिन्यात संदेशचा चैताली कदम सोबत साखरपुडा संपन्न झाला. हॉटेलच्या या व्यवसायात संदेशला चैतालीची भक्कम साथ मिळाली आहे. हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. फिश करी राईस हे हॉटेल ब्रँड त्यांनी पुण्यात देखील सुरू केलेले होते. उत्तम चवीचे सी फूड इथे मिळत असल्याने त्यांना टाइम्स फूड अँड नाईट लाईफ अवॉर्डने तब्बल १० वेळा सन्मानीत करण्यात आले आहे. त्याचमुळे याची मुंबईत सुद्धा एक शाखा असावी या विचाराने त्यांनी दादर येथे हे हॉटेल सुरू केलेले पाहायला मिळते.

पुण्यातील त्यांचे हे सी फूड मिळणारे हॉटेल खवय्यांचे मुख्य आकर्षण ठरले आहे. त्याचमुळे मुंबईत देखील या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांना आहे. २०११ साली पुण्यात त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. कोथरूड, बाणेर, टिळक रोड आणि विमाननगर या परिसरात त्यांच्या हॉटेलच्या शाखा आहेत. हॉटेल व्यवसायात येण्यासाठी सुधीर भट यांचाही भक्कम पाठिंबा मुलांना मिळाला होता. सुधीर भट यांच्या पश्चात त्यांचा मुलगा संदेश भट या व्यवसायाला यशाच्या शिखरावर पोहोचवताना दिसत आहेत. यश मिळो वा अपयश अशा दोन्ही गोष्टींना ते हसत हसत सामोरे जाणे हा वडिलांचा गुण मुलामध्ये आल्याने व्यवसायात भरभराट होताना पाहायला मिळते. मुंबईतील या आणखी एका नवीन शाखेनिमित्त संपूर्ण भट कुटुंबियाला अनेक खूप खूप शुभेच्छा.