सोनी मराठी वरील कोण होणार करोडपती या शोच्या आजच्या भागात प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका आणि इन्फोसिसच्या अध्यक्षा सुधा मूर्ती सहभागी होणार आहेत. सुधा मूर्ती यांचा जीवनप्रवास उल्लेखनीय कामगिरी करणारा ठरला आहे आयुष्याच्या वाटेवर त्यांना जे अनुभव आले त्यातूनच त्यांच्या राहणीमानात बदल होत गेले असे म्हणायला हरकत नाही. समाजात वावरताना अनेक दुःख त्यांनी पाहिली यातूनच अशा लोकांना सढळ हाताने मदत करण्याचा त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला. इन्फोसिसच्या अध्यक्षा असूनही त्यांच्या राहणीमानात तुम्हाला साधेपणा जाणवेल. हाताशी एवढा पैसा असूनही त्यांना पैशाचा मोह अजिबात नाही. या समाजचं आपण काहीतरी देणं लागतो अशीच विचारधारा त्यांच्या बालमनावर बिंबवली गेली. त्यांच्या याच जीवनप्रवासाचा थोडक्यात आढावा घेऊयात.

सुधा मूर्ती यांचे माहेरचे नाव सुधा कुलकर्णी. कर्नाटकातील शिगगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पेशाने डॉक्टर कोल्हापूरला त्यांचा दवाखाना होता. सुधा मूर्ती या शालेय शिक्षणात अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जायच्या. पुढील शिक्षणासाठी त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याचे निश्चित केले मात्र हे क्षेत्र पुरुषप्रधान असल्याने त्यांच्या आज्जीचा या क्षेत्र निवडण्याला नकार होता. इंजिनिअर झाल्यावर पुढे लग्नासाठी मुलगा मिळणार नाही असे मत त्यांनी त्यावेळेला व्यक्त केले होते. तर सुधाजींचा गणित विषय पक्का असल्याने तू गणित विषयातून एमएसएसी कर असे त्यांच्या आईने सुचवले होते. वडील डॉक्टर असल्याने त्यांनी डॉक्टर होण्याचा सल्ला दिला होता. मात्र आपल्या निर्णयावर ठाम असलेल्या सुधाजींनी इंजिनिअरिंगलाच प्रवेश घेतला. १९६८ साली बी ई इलेक्ट्रिकलसाठी त्यांनी ऍडमिशन घेतले. विद्यापीठात एकमेव मुलगी शिकत असल्याने सुरुवातीला तिथे महिलांसाठी स्वच्छता गृहच नव्हते त्यामुळे हीच एक मोठी अडचण त्यांना जाणवली. लहानपणापासूनच साधी राहणीमान असल्याने कॉलेजमध्ये त्या चटईवर झोपत असत, गार पाण्यानेच अंघोळ करत, वाईट विचार कधी मनात आणायचे नाहीत हे संस्कार त्यांच्या अंगवळणी पडले होते. कॉलेजमध्ये मुलांनी मुलगी कधी पाहिली नव्हती त्यामुळे बऱ्याच मुलांनी त्यांना प्रेमपत्रं लिहिली होती. ही सगळी प्रेमपत्रं त्यांनी त्यावेळी वडिलांकडे दिली होती. कॉलेजचे हे सर्व मित्र आजही त्यांच्या संपर्कात आहेत असे त्या एका मुलाखतीत सांगताना दिसल्या.

१९७४ साली सुधाजींनी कम्प्युटर सायन्स विषयातून एमटेक केलं. एक दिवस कॉलेजच्या नोटिसबोर्डमध्ये त्यांनी टेल्को कंपनीत अभियंता पदासाठी नोकरी असल्याची जाहिरात वाचली. त्यात महिलांना प्राधान्य नसल्याचे आवर्जून लिहिल्याने सुधाजींना भयंकर राग आला होता. मी मुलगी असूनही कुठलाही इंजिनिअरचा प्रॉब्लेम सोडवू शकते मग मुलींना संधी का देण्यात येऊ नये म्हणून त्यांनी अशा आशयाचे एक पत्र लिहिले होते. मात्र हे पत्र कोणाला द्यायचं हेच त्यांना सुचत नव्हते. इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये एमटेक करत असताना जेआरडी टाटा तिथे १५ मार्चला त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी येणार होते. तेव्हा सुधाजींनी त्यांना लांबूनच पाहिले होते. एका सामान्य कुटुंबातील मुलगी असल्याने पुढे जाऊन त्यांच्याशी बोलण्याचे धाडस झाले नाही म्हणून हे लिहिलेलं पत्र पत्ता माहीत नसल्याने सुधाजींनी जे आर डी टाटा, टेल्को , मुंबई या पत्त्यावर पाठवले. हा पत्ता चुकीचा होता परंतु तरीही हे पत्र जे आर डी टाटा यांच्यापर्यंत पोहोचले. या पत्राची दखल घेऊन जेआरडी टाटा यांनी सुधाजींना हा जॉब ऑफर केला होता. पुण्यातील टेल्को कंपनीत या जॉबसाठी इंटरव्युला ७ जण बोलावली त्यात सुधाजी मुलींमध्ये एकट्या होत्या. इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तींमध्ये ते पत्र यांनीच लिहिलं याची कुजबुज चालू होती. आजही सुधाजींनी लिहिलेल्या या पत्राची आठवण सोशल मीडियावर शेअर केली जाते.