स्टार प्रवाह या वाहिनीवर येत्या ३१ जानेवारी २०२२ पासून दुपारी १.०० वाजता ‘लग्नाची बेडी’ ही नवी मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत अभिनेत्री सायली देवधर आणि अभिनेता संकेत पाठक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला असून या नव्या मालिकेचे स्वागत प्रेक्षकांनी केले आहे. नायिकेच्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेला तरुण इन्स्पेक्टर अभिनेता संकेत पाठक निभावत आहे. आपली ही चूक भरून काढण्यासाठी तो नायिकेसोबत लग्न करतो असे हे कथानक मालिकेच्या प्रोमोमधून पाहायला मिळाले आहे.

यात आणखी एक ट्विस्ट असा की, नायकाची प्रेयसी देखील त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण करणार आहे. ह्या प्रेमिकेची भूमिका अभिनेत्री रेवती लेले निभावणार आहे. सोनी मराठीवरील वैदेही मालिकेनंतर सायली देवधर पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर रेवती ने स्वामिनी मालिकेत रमाबाईंची भूमिका गाजवली होती त्यानंतर ती हिंदी मालिकेत झळकली आता पुन्हा एकदा रेवती तितक्याच तगड्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लग्नाची बेडी ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे समोर आले आहे. स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर गुम है किसीं के प्यार मे ही मालिका प्रसारित होत आहे. याच मालिकेच्या कथेवर आधारित स्टार प्रवाह वाहिनीने लग्नाची बेडी ही मराठी मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजकाल बहुतेक मालिका या कोणत्या ना कोणत्या मालिकेचा रिमेक असल्याचे समोर आले आहे त्यात आई कुठे काय करते ही मालिका देखील बंगाली मालिकेचा रिमेक आहे. याच कथानकावर आधारित अनुपमा ही हिंदी मालिका देखील प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे.

नव्याने दाखल झालेली तुझ्या रूपाचं चांदणं, माझा रंग वेगळा या मालिका देखील अशाच स्वरूपाच्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. कारण याअगोदरही हिंदी टीव्ही क्षेत्रात अशा मालिका दाखल झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. राजा राणीची गं जोडी या मालिकेचा देखील गुजराथी भाषेत रिमेक बनवण्यात आला आहे. त्यामुळे आता नवे कथानक प्रेक्षकांसमोर आणण्यापेक्षा त्याच कथानकाचा आधार घेऊन रिमेक बनवण्यावरच अधिक भर दिलेला पाहायला मिळतो. लग्नाची बेडी या मालिकेत प्रेक्षकांना नवे काय पाहायला मिळणार याची उत्सुकता तर आहेच. कथानकाचा आधार घेत मालिकेत आणखीन काही नवीन पाहायला मिळणार कि जशी च्या तशी मालिका मराठीत पाहायला मिळणार हे येत्या काही दिवसातच पाहायला मिळेल. असो लग्नाची बेडी या मालिकेसाठी सायली देवधर, रेवती लेले आणि संकेत पाठक यांना शुभेच्छा…