आरआरआर या बहुचर्चित चित्रपटाच्या यशाची घोडदौड दोन आठवड्यानंतरही अशीच सुरूच आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला होता. राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार असे या चित्रपटाबाबत बोलले जात होते मात्र दुर्दैवाने हा रेकॉर्ड झाला नसला तरी तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद पाहता हा चित्रपट १००० कोटींच्या घरात जाताना दिसणार आहे. कालपर्यंत जगभरातून ९६० कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटातील कलाकाराने प्रेक्षकांचीच नाही तर चित्रपटाच्या बॅक आर्टिस्टची देखील मने जिंकून घेतली आहेत त्याला कारणही तसेच आहे.

चित्रपट यशस्वी होणे न होणे हे सर्वस्वी त्या चित्रपटाच्या कलाकारांवर, दिग्दर्शकांवर आणि कथानकांवर अवलंबून असते असे म्हटले जाते. परंतु पडद्यामागच्या कलाकारांनी देखील हा चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून जीवतोड मेहनत घेतलेली असते. याच कलाकारांचे मन जिंकून घेतलेल्या सुपरस्टार राम चरण याच्या निर्णयाचे आता सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. दाक्षिणात्य कलाकार हे नेहमीच सामान्यांच्या मदतीसाठी धावून येत असतात आणि म्हणूनच त्यांना तिथे आदराचे स्थान दिले जाते. अगदी चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर त्यांच्या कटआऊटला दुग्धाभिषेक घातला जातो ते ह्याच कारणामुळे. सुपरस्टार राम चरणचे कुटुंब दाक्षिणात्य सृष्टीत धनाढ्य मानले जाते परंतु त्यांची सढळ हाताने मदत करण्याची वृत्ती देखील तेवढीच कौतुकास्पद म्हणावी लागेल. नुकतेच राम चरणने आरआरआर चित्रपटाच्या यशाचा वाटा बॅक आर्टिस्टला देऊ केला आहे. चित्रपटाचे सहदिग्दर्शक, सहाय्यक, सहनिर्माते, कॅमेरामन या सर्वानाच त्याने प्रत्येकी १ तोळ्यांचे सोन्याचे नाणे देऊ केले आहे. आपल्या या यशाच्या प्रवासात खारीचा वाटा म्हणून त्यांना ही भेट म्हणून देण्यात आली आहे. या प्रत्येक सोन्याच्या नाण्यावर ‘RRR’ या चित्रपटाचे नाव कोरण्यात आले आहे.

या कृतीमुळे राम चरणचे चाहते पुरते भारावून गेले आहेत. त्याच्या या दिलदारपणाचे सर्वच स्तरातून मोठे कौतुक केले जात आहे. चित्रपटात ज्युनिअर एनटीआरने भीमा तर राम चरणने सीताराम राजुची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे कथानक तुम्हाला विसाव्या शतकात घेऊन जाते. एका मुलीला इंग्रज उचलून घरून जातात तिचा शोध घेत हा भीमा दिल्लीला जातो. इथेच भीमा आणि सीताराम यांची भेट घडून येते. या दोघांच्या मैत्रीचं सुंदर रूप चित्रपटातून दर्शवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एका ठिकाणी खिळवून ठेवण्याची ताकद या दोन्ही सुपरस्टार्सनी जबरदस्त पेलली आहे. म्हणूनच हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांची गर्दी खेचून आणत आहे.