२६ वर्षीय दाक्षिणात्य अभिनेत्री गायत्री हिचा अपघातात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी होळीच्या पार्टीवरून घरी येत असताना हैद्राबादच्या गचीबोवली परिसरात तिच्या गाडीला अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्याने त्यावरील नियंत्रण सुटले आणि गाडी डिव्हायडरला जोरदार आदळली. हा अपघात ईतका भीषण होता की गायत्रीचे जागीच निधन झाले. गायत्रीसोबत तिची एक खास मैत्रीण देखील होती. गाडीचे स्टेअरिंग तिच्या मैत्रिणीच्या हातात होते. या अपघातात गायत्रीच्या मैत्रिणीला देखील गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे तिला ताबडतोब उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिथेच तिनेही आपला प्राण सोडला. गायत्रीच्या या मैत्रिणीचे आडनाव राठोड असल्याचे सांगितले जाते.

या अपघातात गायत्री आणि तिच्या मैत्रिणीखेरीज आणखी एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते. रस्त्याने जाणाऱ्या महिलेला गाडीची धडक बसली आणि यातच गाडीखाली चिरडून त्या महिलेचा देखील मृत्यू झाला. या भीषण अपघात तिघींचा मृत्यू झाल्याने स्थानिकांनी देखील हळहळ व्यक्त केली होती. डॉली डी क्रूझ हे गायत्रीचे खरे नाव आहे. गायत्री सोशल मीडिया स्टार होती. युट्युबवर तिचा जलसा रायुडू या नावाने एक चॅनल आहे. यातून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली होती.सोशल मीडियावर हिट झाल्यानंतर तिला ‘मॅडम सर मॅडम अंते’ या तेलगू वेबसिरीज मध्ये अभिनयाची संधी मिळाली होती. याशिवाय गायत्रीने काही शॉर्टफिल्ममध्येही काम केले होते. त्यामुळे गायत्रीने स्वतःचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. अपघातात जागीच मृत्यू झालेल्या गायत्रीची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे त्यामुळे या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गायत्रीच्या निधनाची बातमी तिची सहकलाकार सुरेखा वाणी यांनी सोशल मीडियावर जाहीर केली त्यावेळी गायत्रीच्या चाहत्यांनी कमेंट्सद्वारे हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली.