पुढचं पाऊल मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिला शिंदे लवकरच रिलीज होत असलेल्या लाईफलाईन या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सध्या शर्मिला शिंदे ही नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून दुर्गाची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने शर्मिलाने तिच्या मनातली एक खदखद बाहेर काढली आहे. काही दिवसांपूर्वी शर्मिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर एआय या तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल एक आक्षेप नोंदवला होता. तू भेटशी नव्याने या मालिकेतून सुबोध भावे दुहेरी भूमिकेत दिसतो आहे. त्याच्या तरूणपणाची भूमिकाही एआयच्या माध्यमातून साकारली जात आहे. यावरून शर्मिलाने विरोध दर्शवत ही भूमिका एका चांगल्या कलाकाराला देता आली असती असे म्हटले होते.
या एआयमुळे कलाकारांच्या पोटावर पाय पडतोय असे तिने यातून सुचवले होते. याच मुद्द्यावर शर्मिलाने पुन्हा एकदा हात घातलेला पाहायला मिळाला. एआयचा वापर योग्य पद्धतीने व्हावा अशीच एक इच्छा तिने यावेळी व्यक्त केली. नाहीतर मग कलाकारांचं अस्तित्वच नष्ट होऊ शकतं अशीही एक भीती तिने व्यक्त केली. चित्रपटांच्या अवॉर्ड सोहळ्यात किंवा प्रमोशन सोहळ्यात बहुतेकदा सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर्सना आमंत्रित केलं जातं. याबद्दल ती म्हणते की, “एका सोहळ्यात रेड कार्पेटवर सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर्स आले होते. काय संबंध आहे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर्सचा?. तो एक चित्रपटांचा सोहळा होता इथे सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर्सची काहीही गरज नव्हती ” असे शर्मिला म्हणते.
त्यावर अभिनेत्री भूमिजा पाटील हिनेही एक उदाहरण देताना म्हटले की, “या इन्फ्लुएन्झर्स मुळे कलाकारांनाच आता महत्व राहिलेलं नाही. एका प्रोजेक्टसाठी एका इन्फ्लुएन्झर्सची निवड झाली होती पण तिथे काहितरी इश्यू झाला म्हणून मग त्याजागी माझी निवड झाली.” हल्ली बहुतेक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इन्फ्लुएन्झर्सना आमंत्रित केलं जातं. पण कलाकारांमध्ये आता याबद्दल एक कुजबुज पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तुमचे फॉलोअर्स जास्त असतील तर तुम्हाला कास्ट केलं जातं . पण आता ज्यांनी कधीच अभिनयाचे धडे गिरवले नाहीत ते सोशल मीडियाचे स्टार आता मालिका, चित्रपटात येऊ लागले आहेत. म्हणजे तुम्ही आता अभिनय शिकण्याची गरज नाही तर फक्त फॉलोअर्सची संख्या वाढवायला हवी अशी एक खंत कलाकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.