स्वप्नील बांदोडकर हा मराठी सृष्टीत पार्श्वगायक म्हणून ओळखला जातो. राधा ही बावरी, गालावर खळी, ओल्या सांजवेळी, का कळेना कोणत्या, गणाधिशा, परी म्हणू की सुंदरा, वादळवाट, मला वेड लागले अशी अनेक गीतं त्याने गायली आहेत आणि ती आजही रसिकप्रेक्षकांच्या ओठावर आहेत. नुकतेच चला हवा येऊ द्या च्या मंचावर स्वप्नील बांदोडकर, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर या कलाकारांनी हजेरी लावली होती. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे कलाकार मंचावर दाखल झाले होते. त्यावेळी निलेश साबळेने पल्लवी जोशीला अंताक्षरीवरून प्रश्न विचारला.

तुमच्या घरी तुम्ही अंताक्षरी खेळत असता त्यावेळी तुम्ही सूत्रसंचालन करता की अंताक्षरी खेळता हा मजेशीर प्रश्न विचारला होता. कारण पल्लवी जोशी यांनी सारेगमप सारख्या आणि अंताक्षरी सारख्या रिऍलिटी शोमधून सूत्रसंचालिका म्हणून काम केले होते. पल्लवी जोशी यांच्या आई सुषमा जोशी या गायिका तसेच संगीत शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे घरातील वातावरण संगीतमय असायचं अशी आठवण पल्लवी जोशी यांनी यावेळी सांगितली. तसेच स्वप्नील बांदोडकर याची पत्नी संपदा बांदोडकर ही माझी मावस बहीण आहे त्यामुळे संगीत क्षेत्राशी आमच्या कुटुंबाचं अगदी घट्ट नातं आहे. स्वप्नील बांदोडकर याची पत्नी संपदा ही देखील पार्श्व गायिका आहे. पुण्यातील संक्रम म्युजिक अकॅडमी येथे त्या डिपार्टमेंट हेड म्हणून कार्यरत आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या संपदा यांनी संगीत शिक्षिका म्हणून अनेक नवख्या कलाकारांना संगीताचे प्रशिक्षण दिले आहे. अनेक मंचावरून त्यांनी आपल्या गायकीची झलक दाखवून दिली आहे. स्वप्नील बांदोडकर प्रमाणे संपदा बांदोडकर यांनी देखील संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

पल्लवी जोशी यांचे संपूर्ण कुटुंबच चंदेरी दुनियेशी निगडित आहे. त्यांचा भाऊ अलंकार जोशी हा बॉलिवूड सृष्टीत बालकलाकार म्हणून नावारूपाला आला होता तर त्यांची बहीण पद्मजा जोशी यांनी देखील मराठी चित्रपटातून काम केले आहे. द काश्मीर फाईल्स या आगामी बॉलिवूड चित्रपटाच्या निमित्ताने ही कलाकार मंडळी चला हवा येऊ द्या च्या शोमध्ये आली होती. येत्या ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. काश्मीर पंडितांवरील झालेल्या अत्याचारावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून दबाव आणण्यात आले होते. अखेर हिम्मत न हरता चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कुठल्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.