
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी लव्हस्टोरी खऱ्या आयुष्यातही घडू शकते यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण सातारा जिल्ह्यातील फलटण येथील ऋषिकेश आणि प्राची यांची लव्हस्टोरी मात्र तितकीच हटके पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ९ सप्टेंबर २०२१ रोजी ऋषिकेश मोरे आणि प्राची सावंत यांचा विवाह संपन्न झाला आहे. त्यानिमित्ताने या दोघांचे आसपासच्या परिसरात मोठे कौतुक होताना दिसत आहे. ऋषिकेश मोरे हा मूळचा फलटणचा. तेथील मुधोजी कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण घेतले आहे. ऋषिकेश हा दिव्यांग आहे त्याला दोन्ही हात नसून एका पायाने तो अधू झाला आहे.

एवढे असूनही परिस्थितीला खंबीरपणे तोंड देत तो कला क्षेत्रात आपले नाव लौकिक करताना दिसत आहे. ऋषीकेशला संगीताची भयंकर आवड आहे. शिवाय तो एक उत्कृष्ट गायक देखील आहे. Ak स्टुडिओ शी तो निगडित असून म्युजिक डायरेक्टर, कंपोजर आणि गायक असलेल्या ऋषीकेशने अल्बम साठी गाणी देखील गायली आहेत. ‘जगण्याच्या खेळामंदी’, ‘मूर्तिकार’ ‘लफंडर्स’ (वेबसिरीज) या व्हिडीओ अल्बमसाठी आणि वेबसिरीज साठी त्याने म्युजिक दिले आहे. ऋषिकेशची पत्नी प्राची ही देखील गायिका आहे. झी म्युजिक प्रस्तुत ‘मन चांदन झालया’ या गाण्यात अभिनेत्री गिरीजा प्रभू झळकली होती या गाण्याला ऋषिकेशने म्युजिक दिले असून प्राचीने हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. ऋषिकेश आणि प्राची यांची ओळख संगीत क्षेत्रामुळेच झाली. गेल्या तीन वर्षांपासून त्यांची चांगली ओळख होती. गाण्यामुळे हे दोघे एकत्रित आले आणि प्राचीला ऋषीकेशचा स्वभाव आवडू लागला. दोघांचे प्रेम जुळून आल्यावर त्या दोघांनी घरच्यांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

गुरुवार ९ सप्टेंबर रोजी अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्या मित्रमंडळींना आमंत्रित करून त्यांच्या लग्नाचा सोहळा संपन्न झाला. आजच्या युगात प्रत्येकालाच आपला जोडीदार हा स्मार्ट असावा आणि तो बक्कळ कमावणारा असावा अशी अपेक्षा असते मात्र या गोष्टीला छेद देऊन प्राचीने एक नवा आदर्श समाजापुढे घडवून आणला. यामुळे प्राचीचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. ऋषिकेश दिव्यांग जरी असला तरी तो त्याच्या जिद्दीच्या जोरावर कला क्षेत्रात स्वतःचे नाव कमावण्यात यशस्वी ठरला आहे त्याच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला मनापासून दाद द्यावी वाटते. ऋषिकेश आणि प्राची आयुष्याच्या ह्या सुंदर वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..