सारेगमप लिटिल चॅम्पस या शोमधून रोहित राऊत हा कलाकार गायक बनून प्रेक्षकांसमोर आला. आजवर हृदयात वाजे समथिंग, दाटलेले धुके, कधी कधी अशी अनेक चित्रपट तसेच अल्बममधील गाणी त्याने गायली आहेत. शिवाय हिंदी मराठी अशा संगीत रिऍलिटी शोमधूनही त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. अशा या हरहुन्नरी कलाकाराला नुकतेच नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात आले आहे . रोहित बाबत नेमके काय घडले आहे ते जाणून घेऊयात… काल शुक्रवारी ईद आणि अक्षय तृतीया हे दोन्ही सण साजरे करण्यात आले.

रोहितने काल ‘पिया हाजी अली…’ हे गाणे गाऊन इंस्टाग्रामवरून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओ पाठोपाठ त्याने अक्षय तृतीयेच्या देखील चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यावरून नेटकऱ्यांच्या ट्रोलला त्याला सामोरे जावे लागलेले पाहायला मिळते आहे. त्या व्हिडिओवर अनेकांनी आक्षेप दर्शवत आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत… तुम्ही आपली संस्कृती विसरलात का असे ट्रोलर्सचे म्हणणे होते. ट्रोलर्सचा आक्रोश पाहून रोहितने लगेचच त्यांची माफी मागून एक पोस्ट शेअर केली त्यात तो म्हणतो की, “माझा व्हिडीओ हा कुणाच्याही भावना दुखावण्याचा नसून फक्त एवढंच सांगण्यासाठी आहे की प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक सण हा तितकाच महत्वाचा आहे. पण गाण्याला आणि कलेला कुठला धर्म नाही त्यामुळे एखादं गाणं पोस्ट केल्यावर त्या कलाकाराला तुम्ही आपली संस्कृती विसरलात असे बोलून दुखवायचे कारण नाही , ह्या कठीण काळात आपण माणूस म्हणून एकत्र येऊया आणि सकारात्मक भावना पसरवूया!”… या जाहीर माफी नंतर रोहितने आणखी एक व्हिडिओ शेअर करून त्यात म्हटले..

रोहित म्हणतो की, “काही वेळापूर्वी मी जो व्हिडीओ टाकला होता त्यामुळे भरपूर लोकांच्या भावना दुखावल्या, पण माझा यामागचा असा कुठलाही हेतू नव्हता की कुठल्या एका समाजाला किंवा एखाद्या व्यक्तीला याचं वाईट वाटलं पाहिजे हे एक गाणं म्हणून मी ते टाकलं होतं, त्याच्यावर कमेंट्समध्ये लोकांनी त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे थोडासा राग आला, शेवटी कलाकार आहे आणि मला जे वाटलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला ह्यात कुठलाही धार्मिक वळण देण्याचा हेतू नाही… शंभूराजे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मला खूप खूप आदर आहे..मला गर्व आहे मी महाराष्ट्रीयन आहे इतक्या मराठी लोकांच्या प्रेमामुळे मी आज इथं आहे तुमच्यापेक्षा मी मोठा नाही आणि त्यामुळे मला अस वाटत जो वाद झाला तो विसरून एकत्र येऊयात…तुमचं प्रेम असच राहुद्या आणि येणाऱ्या काळात मी नक्कीच शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणं पोस्ट करेन…”