गेल्या काही दिवसांपासून गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या घरी लगीन घाई सुरू झालेली होती. आज रविवारी २३ जानेवारी २०२२ रोजी जुईली आणि रोहित राऊत ११.०९ मिनिटाच्या शुभ मुहूर्तावर विवाहबद्ध झाले आहेत. पाच दिवसांपूर्वी जुईली जोगळेकरने गृहमख पूजन केले होते त्यानंतर दोघांनी हळदीचा छोटासा कार्यक्रम आपापल्या घरी साजरा केला होता. जुईली यावेळी पुण्याला आपल्या घरी आली होती लग्न सोहळा पुण्यातच होणार असल्याने दोन दिवसांपूर्वी रोहित आपल्या कुटुंबासोबत पुण्याला जायला निघाला होता.

त्यानंतर दोघांच्या साखरपुड्याचा सोहळा पार पडला. साखरपुड्याच्या दिवशी अंगठी घालताना दोघेही काहीसे भावुक झाले होते. त्यानंतर त्यांच्या हळदीचा सोहळा धुमधडाक्यात पार पडला. काल संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जुईली आणि रोहितने गाणी गाऊन उपस्थितांची मने जिंकून घेतली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली लगीनघाई आज अखेर नात्याच्या बंधनात अडकलेली पाहायला मिळत आहे. रोहित आणि जुईलीचे लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडले असून रोहितने धोती कुर्ता आणि जुईलीने काष्टा साडी नेसली होती. यावेळी डार्क राणीकलरला विशेष प्राधान्य दिलेले पाहायला मिळाले.

जुईली आणि रोहित च्या लग्नसोहळ्याला मिताली मयेकर हिने सुरुवातीपासूनच उपस्थिती दर्शवली होती. श्रेया डफळापुरकर, नचिकेत लेले सारख्या कलाकारांनी त्यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. रोहित आणि जुईली यांचा विवाहसोहळा पुण्यातील ढेपे वाडा येथे पार पडला असून या वाड्याला आजवर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी पसंती दर्शवली होती. गेल्या वर्षी मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या लग्नाचा सोहळा ढेपे वाडा तेथेच संपन्न झाला होता. त्याचप्रमाणे मृण्मयी देशपांडे स्वप्नील राव आणि सुरभी हांडे दुर्वेश यांचे लग्न इथेच पार पडले होते. रोहित आणि जुईलीच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुम्हाला पाहायला मिळतील. आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी रोहित आणि जुईली यांचे खूप खूप अभिनंदन…