ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या धाकट्या मुलाला आनंद भोसले यांना अचानक चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आनंद भोसले हे दुबईत वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध होऊन खाली पडले. कुटुंबियांनी त्यांना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले असल्याचे सांगितले जाते. दरम्यान आशा भोसले या देखील आता दुबईत राहून आपल्या मुलाची काळजी घेताना दिसत आहेत.

मुंबईत असलेले त्यांचे काही नातेवाईक कुटुंबियांच्या संपर्कात असून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत आहेत. आनंद भोसले हे चित्रपट दिग्दर्शन तसेच व्यवसाय क्षेत्रात सक्रिय आहेत. आनंद हे आशा भोसले यांचा धाकटा मुलगा आहे . त्यांचा थोरला मुलगा हेमंत भोसले यांचे काही वर्षांपूर्वी दुःखद निधन झाले होते. हेमंत भोसले हे म्युजिक कंपोजर होते. त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. काही वर्षे ह्या आजाराला ते खंबीरपणे झुंज देत होते मात्र वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांचे या आजाराने दुःखद निधन झाले होते. स्कॉटलंड येथे ते वास्तव्यास होते. तर आशा भोसले यांची मुलगी वर्षा भोसले यांनी २०१२ साली स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. वर्षा भोसले या गायिका होत्या. त्यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपटासाठी गाणी गायली होती. गायनासोबतच वर्षा भोसले यांना लेखनाची आवड होती. एक स्तंभलेखिका म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून त्या मानसिक तणावात वावरत होत्या आत्महत्या करण्याअगोदर त्यांनी काही वर्षांपूर्वी झोपेच्या गोळ्या खाऊन आपले आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या दोन्ही मुलांच्या बाबतीत अशा घटना घडल्याने आशा भोसले काळजीत आहेत. दरम्यान आनंद भोसले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगितले जाते. आयसीयूमधुन त्यांना जनरल वार्डमध्ये हलवण्यात आले आहे. पुढचे काही दिवस आता आशा भोसले आपल्या मुलासोबत त्याची काळजी घेण्यासाठी तेथेच राहणार आहेत. आनंद भोसले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने चिंतेचे काही कारण नाही असे स्पष्टीकरण दिले जात आहे.