
सध्या कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सिनेमातील एकेक गाणं प्रेक्षकांसमोर आणण्याचा ट्रेंड सुरू आहे. सिनेमाविषयी उत्सुकता वाढवण्याचा हा फंडा सध्या चांगलाच हिट होतोय. तमाशा लाइव्ह हा सिनेमा अजून रिलीज व्हायचा आहे तोपर्यंतच या सिनेमातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आता या सिनेमातील नवं गाणं रिलीज झालंय आणि या गाण्यासाठी आवाज दिलाय तो अभिनेता सिध्दार्थ जाधव याने. या गाण्याचीही जोरदार चर्चा सुरू झालीय. अभिनेता सिध्दार्थ जाधव तमाशा लाइव्ह सिनेमामध्ये अभिनय करताना दिसणार आहेच, पण त्याने पडदयामागे गायकाचीही भूमिका बजावली आहे. मेल्याहून मेल्यागत झाल या गाण्यासाठी सिध्दूने आवाज दिला आहे.

रॅप साँगस्टाइल असलेल्या या गाण्यात माणसाच्या आयुष्याची व्यथा सांगणारे शब्द रचण्यात आले आहेत. विदुषकाच्या लुकमध्ये सिध्दार्थवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. यानिमित्ताने सिध्दू गायक म्हणून प्रेक्षकांसमोर आला आहे. यू ट्यूबवर हे सिध्दूच्या आवाजातील गाणं रिलीज होताच त्याच्या चाहत्यांनी सिध्दूच्या या नव्या इनिंगला शुभेच्छा दिल्या आहेत. आयुष्याचा गंभीरपणे विचार करायला लावणारं हे गाणं इतर उडत्या गाण्यांइतकच लोकप्रिय होत आहे. या सिनेमातील तुझा छंद लागला आणि हाच आहे वाघ या दोन्ही गाण्यानंतर आता मेल्याहून मेल्यागत हे गाणं समोर आलं आहे. तमाशा लाइव्ह या सिनेमातील सोनाली कुलकर्णी हिच्यावर चित्रित झालेल्या असा कसा बाई मला तुझा छंद लागला या गाण्यावर इन्स्टाग्रामवर रिल्सचा पाऊस पडत आहे. नुकतच या सिनेमातील मेल्याहून मेल्यागत झालं हे गाणं सोशल मीडियावर गाजतय. काही दिवसांपासून सिध्दार्थ जाधव हा त्याच्या व्यक्तीगत आयुष्यातील काही घटनांमुळे चर्चेत आहे. सिध्दू आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्यातील संबंध बिघडल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

तृप्ती गेली गेले काही दिवस सिद्धार्थ सोबत राहत नाही असं म्हटलं जातंय पण सिद्धार्थ दुबईला गेला असताना तृप्ती देखील तेथे हजार होती हे तृप्तीच्या सोशिअल मीडिया अकाऊंटवरून पाहायला मिळतं, तसेच काही दिवसापूर्वी तृप्तीने तिच्या सोशल मीडिया पेजवरून जाधव हे नाव हटवल्याने सिध्दूपासून बायको तृप्ती घटस्फोट घेत असल्याची चर्चा आहे. मात्र याला सिध्दू किंवा तृप्ती यांनी दुजोरा दिलेला नाही. तर सिध्दूनेही हे फक्त तुलाच माहितीय असं म्हणत तृप्तीसाठी भावनिक पोस्टही शेअर केली होती. नुकतंच सिद्धार्थने आपल्या मुलीच्या वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे त्यात सिद्धार्थ सोबत त्याची पत्नी देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याच्यावर केले गेलेले दावे साफ चुकीचे आहेत असंच दिसतंय. एकीकडे सिध्दू खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे तर दुसरीकडे त्याच्या तमाशा लाइव्ह या सिनेमातील त्याच्या आवाजातील गाण्यानेही प्रसिध्दीच्या वलयात आला आहे. सिध्दू अभिनेता म्हणून तर चाहत्यांमध्ये हिट आहेच, पण आता गायक म्हणून प्रेक्षक त्याला काय पावती देतात हे तमाशा लाइव्ह पडद्यावर आल्यानंतरच कळेल. सिध्दूचा दे धक्का २ हा सिनेमाही लवकरच पडदयावर येणार आहे.