मी हिंदी बोलत नाही पण मला …थ्री इडियट्स चित्रपटाला श्यामची आई मधील माधव वझे यांनी दिला होता नकार
१९५३ सालचा श्यामची आई हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला आहे. या चित्रपटात माधव वझे यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. आज माधव वझे ८४ वर्षांचे आहेत मात्र या वयातही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे. माधव वझे हे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक नेस वाडिया कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापकाचे काम केले. तर ललीतकला केंद्र मध्ये त्यांनी अभिनय विषयक प्राध्यापक म्हणूनही नोकरी केली होती. माधव वझे यांनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले होते. त्यांचे वडीलही शिक्षक होते. जेव्हा श्यामची आई चित्रपट लोकप्रिय झाला तेव्हा त्यांनी वहिनीच्या बांगड्या हा आणखी एक चित्रपट केला. पण त्यानंतर चित्रपटाच्या ऑफर येऊनही वडिलांनी अभिनय क्षेत्रात जाण्याला नकार दिला होता. खरं तर अभिनय क्षेत्रात जम बसेल की नाही याची शाश्वती त्यांना नव्हती.
पण आपल्या मुलाने किमान पदवी मिळवून नोकरी तरी करावी आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी त्यांची इच्छा होती. माधव वझे यांनाही वडिलांचे म्हणणे योग्य वाटले. म्हणून मग एम ए केल्यानंतर इंग्रजी विषयातून त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. पण नोकरीसोबतच नाटकात काम करण्याची आवडही ते जोपासत होते. निवृत्ती नंतर पुढे थ्री इडियट्स तसेच डिअर जिंदगी अशा हिंदी चित्रपटातही माधव वझे यांना अभिनयाची संधी मिळाली. खरं तर थ्री इडियट्स या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी अगोदर नकार दिला होता. कारण चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आपण कसे दिसतो हे माहीतच नव्हते. हा किस्सा माधव वझे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे. राजकुमार हिराणी यांनी माधव वझे यांना या चित्रपटात काम करण्याची ऑफर देऊ केली होती. हा किस्सा सांगताना ते म्हणतात की, ” मला एक दिवस अचानक चित्रपटात काम करणार का? म्हणून हिराणी यांचा फोन आला. तर मी त्यांना नाही म्हणालो, कारण तुम्ही मला बघितलेलं नाही. तेव्हा त्यांनी मला श्यामची आई चित्रपट बघितल्याचे सांगितले. पण त्यावेळी मी खूप लहान होतो तो आता मी राहिलो नाही , मी आता कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. तेव्हा त्यांनी माझे आताचे फोटो त्यांच्याकडे असल्याचे सांगितले.
हिराणी म्हणाले की माझ्या टेबलवर आता मिस्टर लोबोच्या भूमिकेकरता २५ ते ३० फोटो आहेत. पण माझी नजर सारखी तुमच्या फोटोकडे जातेय. तुम्ही या भूमिकेसाठी योग्य आहात असे मला वाटते. तरीही मी हिराणीजींना म्हटलं की ‘मी हिंदी बोलत नाही’. त्यावरही ते म्हणाले की तुम्हाला काहीच बोलायचं नाहीये.” या उत्तरानंतर मात्र वझेंनी चित्रपटात काम करण्यास होकार दिला. पुढे या चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबद्दल माधव वझे सांगतात की, “मी जॉयच्या वडिलांची भूमिका साकारत असतो. एका सीनमध्ये मी स्मशानात गवत काढतो असे दाखवायचे होतो तेव्हा मुलाने आत्महत्या केली असा मला फोन येतो हा सिन आम्हाला प्रॅक्टिस म्हणून करायचा होता. तेव्हा मी गवत काढत असताना एक गाणं गुणगुणतो. हे पाहून हिराणी यांना आश्चर्य वाटतं. ते लगेचच माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्या या ऍडिशनचं कौतुक केलं. ते मला म्हणाले की, म्हणूनच आम्ही आमच्या चित्रपटात मराठी कलाकारांना संधी देतो, आमचे हिंदी कलाकार पाट्या टाकण्याचे काम करतात पण मराठी कलाकार स्वतःची बुद्धी वापरतात त्यांचं हे बोलणं मला जणू सर्टिफिकेटच आहे असं वाटलं होतं.” असे माधव वझे सांगतात.