
“रा री रा रा रे…” हे टायटल सॉंग कुठल्या मालिकेचं आहे हे झी मराठीच्या प्रेक्षकांना चांगलंच ठाऊक आहे. देवमाणूस या मालिकेने मालिका सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला होता. देवमाणूस आणि देवमाणूस २ या मालिकेच्या यशानंतर आता तुमच्या भेटीला “देवमाणूस मधला अध्याय” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवमाणूस मालिकेत अभिनेता किरण गायकवाडने मुख्य भूमिका साकारली होती. वाई तालुक्यात घडलेल्या सत्य घटनेवर ही मालिका आधारित होती. त्यामुळे मालिका पाहताना सतत एक उत्कंठा वाढवताना दिसायची. देवमाणूस मालिका संपली त्यानंतर या मालिकेचा दुसरा पार्ट यावा अशी मागणी होऊ लागली. प्रेक्षकांनी या पार्ट २ लाही भरभरून प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.
आता श्वेता शिंदे या मालिकेचा मधला अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. देवमाणूस मधला अध्याय अशा अशयाची ही मालिका कशी असणार याचा पहिला प्रोमो नुकताच समोर आला आहे. शिलाई मशीनवर कापड शिवणारा एक व्यक्ती अंधारात बसलेला दाखवला आहे. बॅगराउंडला रारीरारारे हे शीर्षक गीत आणि महिलेच्या किंचाळण्याचा आवाज येत आहे. या प्रोमोमधूनच मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. या मालिकेत किरण गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार नाही असे काही जाणकार लोकांनी मत व्यक्त केलं आहे.
अर्थात किरण गायकवाडने साकारलेला डॉक्टर प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे त्यामुळे तोच या भूमिकेसाठी योग्य ठरेल असे मत व्यक्त केले जात आहे. मालिकेत कोणकोणत्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळते हे येत्या काळातच स्पष्ट होईल. तूर्तास हा प्रोमो पाहिल्यानंतर झी मराठीकडे पाठ केलेले प्रेक्षक पुन्हा एकदा परततील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान देवमाणूस मालिकेचा हा मधला अध्याय कधी सुरू होणार हे झी मराठी वाहिनी लवकरच जाहीर करेल.