झी मराठीवरील पारू या मालिकेत एक रंजक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस या मालिकेत प्रीतम आणि प्रियाच्या लग्नाची लगबग सुरू होती. पण आता या मालिकेत अनुष्काच्या एंट्रीने वेगळे वळण मिळाले आहे. अनुष्का ही दिशाची मदत करताना पाहायला मिळते. किर्लोस्कर कुटुंबाविरोधात ती मोठे कटकारस्थान रचत आहे. अनुष्का आर्किटेक्ट आहे त्यामुळे ती सहज किर्लोस्करांच्या मनात स्थान मिळवत आहे. घरातील सगळेचजण तिची वाहवा करण्यात गुंग आहेत. एवढंच नाही तर आदित्य सोबत तिचं लग्न जुळावं म्हणून प्रत्येकजण प्रयत्नात आहे.
पण इकडे मात्र पारूला तिच्या चांगुलपणाबद्दल शंका उपस्थित होत आहे. अनुष्का नेमकी कोणत्या कारणाने या घरात आली याचा उलगडा ती लवकरच करेल पण तूर्तास ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल प्रेक्षकांनी थोडीशी नाराजी दर्शवली आहे. अनुष्काची भूमिका अभिनेत्री श्वेता खरात हिने साकारली आहे. श्वेता खरात याअगोदर राजा राणीची गं जोडी आणि मन झालं बाजींद या मालिकेत झळकली होती. पण आता श्वेता खूपच जाड दिसत असल्याने ती या भूमिकेसाठी योग्य वाटत नाही असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे.
आदित्यला शोभेल अशी अभिनेत्री या ठिकाणी कास्ट करायला हवी होती, ही खूप वयस्कर वाटते, हिच्या जागी दुसरी कोणी हवी होती…अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मालिकेबद्दल आता दिल्या जात आहेत. पण अनुष्का हे पात्र विरोधी असल्याने प्रेक्षकांनी तिला स्वीकारले देखील आहे. श्वेताने एक अभिनेत्री म्हणून स्वतःवर मेहनत घ्यायला हवी होती असेही मत व्यक्त केलं जात आहे.