श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या कलाकारांची जोडी प्रथमच छोट्या पडद्यावर झळकली ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून. बऱ्याच प्रतीक्षेनंतर श्रेयस आणि प्रार्थना पुन्हा मालिकेकडे वळल्याने त्यांच्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसली होती. नेहा आणि यशची जुळून आलेली केमिस्ट्री, संकर्षण आणि यशची तसेच लाडक्या परीचा प्रेक्षकांना देखील लळा लागला होता. कथानक सुरळीत सुरू असतानाच नेहा आणि यशचे लग्न होताच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेण्याचे निश्चित केले. मात्र प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा मालिका सुरू ठेवण्यात आली. मालिकेच्या प्रसारणाची वेळ बदलल्याने आणि नेहाच्या जाण्याने प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली. त्यामुळे आता आणखी पाणी ओतून कथानक वाढवत राहण्यापेक्षा ती इथेच संपवावी असा महत्वाचा निर्णय या मालिकेच्या टीमने घेतला आहे.

आज रविवारी एक तासाच्या विशेष भागानंतर सकारात्मक बदल दाखवून मालिकेचा शेवट दाखवला जाणार आहे. या स्पेशल एपिसोडमध्ये अनुष्काला आपल्या पूर्वायुष्यातील घटनांचा उलगडा होणार आहे. त्यानंतर चौधरी कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहायला मिळणार आहे. मात्र आमचा हा प्रवास इथेच संपणार नसल्याचे नुकतेच घोषित करण्यात आले आहे. माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेत असली तरी श्रेयस आणि प्रार्थना लवकरच काहीतरी नवीन घेऊन येणार आहेत. मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर यांच्यासोबत ही लाडकी जोडी पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टच्या कामाला लागली आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शो संपतोय आपलं नातं नाही…आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे वर्षानुवर्षे…कारण आम्ही लवकरच काहितरी नवीन घेऊन येऊ…फक्त तुमच्यासाठी…आणि म्हणूनच कोणीतरी म्हटलंय, पिच्चर अभि बाकी है मेरे दोस्त …कुछ समझें असे म्हणत या दोघांनी आपल्या नवीन प्रोजेक्टबद्दलची पूर्वकल्पना चाहत्यांना सांगितली आहे. त्यामुळे हे दोघे कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून पाहायला मिळणार याची उत्सुकता तमाम चाहत्यांना लागली आहे.

चित्रपट सृष्टीतील मोठमोठ्या सेलिब्रिटींनी छोट्या पडद्याकडे आपली पाऊल वळवली आहेत. त्यातच श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांचे सुद्धा नाव घेतले जाते. सर्वात जास्त मानधन घेणारे सेलिब्रिटी अशी त्यांची ओळख असली तरी देखील या दोघांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवलेली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत ही जोडी झळकणार तेव्हा मराठी प्रेक्षकांनी आनंद व्यक्त करत त्यांचे स्वागत केलेले पाहायला मिळाले. मात्र आता मालिका निरोप घेते हे म्हटल्यावर काही प्रेक्षक नाराज झालेले दिसले. पण आता त्यांची ही नाराजी लवकरच मावळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. हे दोघेही पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येवोत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र हा नवीन प्रोजेक्ट काय असणार याचा उलगडा येत्या काही दिवसातच समोर येईल.