बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतची सध्या चर्चा सुरू आहे ती तिने कोणतं बेधडक विधान केलं म्हणून नव्हे तर तिचा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या रूपातील लुक व्हायरल झाल्यामुळे. कंगना लवकरच नव्या रूपात दिसणार आहे. इमर्जन्सी या सिनेमातील कंगनाच्या इंदिरा लुक सोशलमीडियावर समोर येताच या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. पण आता मराठी रसिकांसाठी या सिनेमाने अजून एका नावाची चर्चा सुरू झाली आणि ते नाव आहे अभिनेता श्रेयस तळपदे याचं. पुष्पा सिनेमासाठी श्रेयसच्या आवाजाची जादू अख्ख्या जगभरातील सिनेविश्वात गाजली आणि आता श्रेयस इमर्जन्सी या सिनेमात माजी पंतप्रधात अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. श्रेयसचा वाजपेयी लुक समोर आला असून या श्रेयसने त्याच्या भावना सोशलमीडियावर शेअर केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून इमर्जन्सी या सिनेमाची चर्चा सुरू आहे. आणीबाणी या मुख्य विषयाभोवती फिरणाऱ्या या सिनेमात कंगना रणौत ही इंदिरा गांधी यांची भूमिका करणार आहे ते तर आता सर्वांनाच माहिती आहे. पण इंदिरा गांधी यांचा पंतप्रधानपदाचा काळ, त्यावेळचे राजकीय नेतृत्व याचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. इंदिरा गांधी यांच्या सहवासात, संपर्कात, विरोधात त्याकाळात जे जे नेते आले त्यांच्या भूमिकेत कोणते कलाकार दिसणार अशा प्रश्नांनी चाहत्यांच्या मनात गर्दी केली होती. त्यातलं पहिलं उत्तर डॉ. जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेतील अनुपम खेर यांच्या पोस्टरने दिलं होतं. आता श्रेयस तळपदे याच्या अटलबिहारी वाजपेयी हा लुक समोर आला आहे. या सिनेमातील श्रेयसच्या एन्ट्रीने त्याच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. वाजपेयी यांच्या लुकमधील श्रेयसचं पहिलं पोस्टर व्हायरल झालं असून कंगना रणौत हिनेही हे पोस्टर शेअर केलं आहे. कंगनाने श्रेयसचा खास लुक शेअर करत असं म्हटलं आहे की, इमर्जन्सी सिनेमातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या रूपातील श्रेयस तळपदे याचा लुक सादर करत आहे. एक सच्चा राष्ट्रवादी, राष्ट्रापती प्रेम आणि अभिमान अतुलनीय होता आणि आणीबाणीच्या काळात जे उदयोन्मुख युवा नेते होते.श्रेयसच्या या लुकवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक चाहता असं म्हणतोय की, या भूमिकेसाठी श्रेयस ही सर्वोत्तम निवड आहे. तर काही चाहत्यांनी हा लुक जमला नाही असं म्हटलं आहे.

लुकपेक्षा तो वाजपेयींचा अभिनय कसा करतो हे सिनेमा पाहून कळेल. कंगना रणौत हिने तिच्या मणिकर्णिका प्रॉडक्शनतर्फे या सिनेमाची निर्मिती केली आहे. तसेच कंगनाच या सिनेमाचं दिग्दर्शनही करणार आहे. सध्या तरी या सिनेमातील कलाकारांच्या लुकमुळेच चर्चा सुरू झाली आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना २५ जून २०२३ या दिवसाची वाट पहावी लागेल. श्रेयसच्या बाबतीत सांगायचं तर तो सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशवर्धन चौधरीच्या भूमिकेत प्रेक्षकांना आवडत आहे. या मालिकेत त्याची प्रार्थना बेहरेसोबत छान केमिस्ट्री जुळली आहे. मोठया पडद्यावर श्रेयसचा इक्बाल, ओम शांति ओम, गोलमाल या सिनेमाचा डंका वाजला आहे. क्रिकेटवीर प्रवीण तांबे यांच्या बायोग्राफी सिनेमातही त्याने प्रवीण तांबे यांची भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफीसवर प्रचंड हिट झालेल्या पुष्पा सिनेमाच्या हिंदी वर्जनसाठी श्रेयसने अल्लू अर्जुनला आवाज दिला होता यामुळेही श्रेयस खूप लोकप्रिय झाला.