सुजय डहाके दिग्दर्शित ‘शाळा’ या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला होता. शालेय जीवनातील मुलांच्या मनाची घालमेल पडद्यावर दाखवणा-या या सिनेमानं राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या सिनेमानं एक नवा अध्याय लिहिला आहे. या सिनेमातील बालकलाकार तुम्हाला चांगलेच आठवत असतील. केतकी माटेगावकर, अशंमुन जोशी यांनी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. तर मुकुंदचा खास मित्र सुर्याची भूमिका केतन पवार याने साकारली होती.

या चित्रपटामुळे केतन पवारला देखील अमाप प्रसिद्धी मिळाली होती. आपल्या मित्रांमध्ये एकतरी सुर्यासारखा मित्र असतो हे सूर्याकडे पाहून प्रत्येकाला जाणीव होते. या चित्रपटानंतर केतन पवार पोपट, कट्टी बट्टी, खोपा, रिंगण या सारख्या चित्रपटातून झळकला आहे. त्याच्या सहाय्यक भूमिका नेहमीच उल्लेखनीय ठरल्या आहेत. अभिनयासोबतच केतन उत्कृष्ट तबला वादक देखील आहे. तबला वादनाचे त्याने प्रशिक्षण घेतले आहे. अनेक म्युजिक शो साठी तो तबलावादक म्हणून काम करताना दिसतो आहे. ‘बहू असोत सुंदर संपन्न..’ हे गाणं काही कलाकारांनी एकत्र येऊन नव्या रुपात सादरीकरण केलं होतं त्यात केतन पवारने देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. सुखन, आम्ही दुनियेचे राजे या कार्यक्रमाचे तो सादरीकरण करताना दिसतो. अभिनय क्षेत्रासोबतच तो संगीत क्षेत्रात देखील नाव लौकिक करताना दिसत आहे. काल म्हणजेच २६ एप्रिल रोजी केतन पवार आणि त्याची खास मैत्रीण प्राची यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडलेला पाहायला मिळाला.

या लग्नसोहळ्याला त्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती. लग्नाचे काही खास फोटो केतनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनयापासून थोडासा दुरावलेला केतन सध्या सांगीतिक कार्यक्रमातून तबला वादक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला आहे. व्यावसायिक नाटक चित्रपट आणि आता संगीत क्षेत्रात त्याने महत्वपुर्ण काम केले आहे. आपल्या कामात पारंगत असलेला केतन पवार नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकताना पाहायला मिळतो. आपल्या रांगडेपणाने आणि सहजसाध्य अभिनयाने तो प्रेक्षकांना नेहमीच आपलंस करताना पाहायला मिळाला. अभिनेता केतन पवार आणि प्राची यांना आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.