जय मल्हार ही महेश कोठारे यांची निर्मिती असलेली मालिका खुप लोकप्रिय झाली होती. या मालिकेमुळे त्यांचा छोट्या पडद्यावर चांगला जम बसू लागला. सध्या ते मालिका निर्मिती क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर त्यांच्या मालिका लोकप्रिय ठरल्या असून लवकरच ते झी मराठीकडेही वळलेले पाहायला मिळत आहेत. जय मल्हार नंतर तब्बल ९ वर्षाने महेश कोठारे “सावळ्याची जणू सावली” ही मालिका झी मराठीवर आणत आहेत. मालिकेच्या शिर्षकातच कथानक दडलेले आहे.
सावळ्या रंगांची पण गोड आवाजाची ही नायिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मालिकेची प्रमुख नायिका प्राप्ती रेडकर असणार आहे. प्राप्ती रेडकर हिला या नवीन मालिकेनिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. कलर्स मराठीच्या काव्यांजली या मालिकेत प्राप्तीने प्रमुख भूमिका साकारली होती. नाटक, चित्रपट अशा माध्यमातून प्राप्तीने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. पण तिच्यास या नव्या मालिकेच्या प्रोमोवरून प्रेक्षकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कारण नायिकेचा रंग सावळा दाखवण्यासाठी प्राप्तीला डार्क मेकअप केला आहे. तिचा हा मेकअप पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
इंडस्ट्रीत सावळ्या मुली खूप आहेत, मेकअप करून सावळ दाखवण्यापेक्षा त्यांना ही संधी द्यायला हवी होती अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे. रंग माझा वेगळा या मालिकेत सुद्धा अभिनेत्री रेश्मा शिंदेला तसा मेकअप करावा लागला होता. एखादया सावळ्या मुलीलाच ही भूमिका का दिली नाही अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून देण्यात येत होत्या. त्यामुळे झी मराठीनेही हाच कित्ता गिरवल्याने मालिकेचा प्रोमो ट्रोल होत आहे.