स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांच्या तुलनेत झी मराठी वाहिनीचा टीआरपी खाली घसरला आहे. लोकप्रियतेच्या स्पर्धेत टॉप दहाच्या यादीत झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ आणि मन उडू उडू झालं केवळ या दोनच मालिका स्पर्धेत टिकुन आहेत. त्यामुळे आपल्या वाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी झी वाहिनीने कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्वच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. नवीन रिऍलिटी शो आणि नव्या मालिका या वाहिनीवर दाखल होत आहेत. मन झालं बाजींद मालिकेनंतर झी वाहिनीने सत्यवान सावित्री ही नवीन मालिका आणली होती. १२ जून रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला.

मात्र प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने अवघ्या दोन महिन्यातच या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. येत्या २२ ऑगस्टपासून झी मराठीवर संध्याकाळी ७ वाजता ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही नवीन मालिका सुरू होत आहे. श्वेता शिंदे निर्मित अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला असून प्रेक्षकांनी या नव्या दमाच्या मालिकेचे स्वागत केलेले पाहायला मिळत आहे. या मालिकेची नायिका कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ही नवखी अभिनेत्री आहे ‘शिवानी नाईक’. शिवानी नाईक हिची ही पहिलीच मालिका आहे त्याअगोदर तिने नाटकांमधून आणि चित्रपटांमधून काम केले आहे. शिवानी सफरचंद या चित्रपटात शिवणू मुख्य भूमिकेत झळकत आहे. नुकताच येऊन गेलेल्या वाय या चित्रपटात ही ती दिसली होती. मॅट्रिक, अखंड, आता कसं करू अशा नाटकांमधून तिने अभिनय साकारला आहे. विविध राज्यनाट्य स्पर्धा , एकांकिकेतून शिवानीने उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकं पटकावली आहेत. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून तिच्या अभिनयाला पुरेसा वाव मिळणार आहे त्यामुळे ती या भूमिकेबाबत खूपच उत्सुक आहे.

मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून येत्या २२ ऑगस्ट रोजी पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत संतोष पाटील वडिलांची भूमिका साकारत आहेत. श्वेता शिंदेची निर्मिती असलेल्या मालिकेवर आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेला गावरान भाषेचा बाज आहे . अप्पीचे वडील रिक्षा चालवून संसाराचा गाडा चालवतात. मोठ्या संघर्षातून अपर्णा आपलं कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करते आणि याचमुळे गावकऱ्यांना तिचा अभिमान वाटतो अशी ही अपर्णा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे श्वेता शिंदेची ही नव्या दमाची मालिका देखील हिट होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा .