
मराठी सिनेमाच्या इतिहासाकडे मान वळवून पाहिले तर आजवर पडद्यावर अनेक ट्रेंड आले. सिनेमा सुरू झाला तेव्हा तो धार्मिक विषयांवर आधारीत होता. त्यानंतर मराठी सिनेमात ऐतिहासिक पर्व आलं. त्यातही शिवाजी महाराज या मुख्य विषयाभोवती शिवकाळातील व्यक्तींचा जीवनपट पडद्यावर मांडणारा ट्रेंड आला. मग त्यानंतरची काही वर्ष मराठी सिनेमाने तमाशापटाची पर्वणी प्रेक्षकांना दिली. या काळात मराठी सिनेमा ग्रामीणबाजाचा होता. हा काळ मागे पडला आणि मराठी सिनेमाच्या कथा सामाजिक, राजकीय विषय हाताळणाऱ्या झाल्या. पुढे मराठी पडदयावर शहरी लुक दिसायला लागला. उडती गाणी आणि आधुनिक वातावरणात मराठी सिनेमा रमला. मधल्या टप्प्यात गंभीर विषयांवरही मराठी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे सिनेमे आले. आता मराठीत ट्रेंड आलाय तो पुन्हा ऐतिहासिक सिनेमांनी भारलेला. प्रेक्षकांचा या ट्रेंडला जोरदार प्रतिसादही मिळतोय.

याच पंक्तीत प्रदर्शित झालेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. मराठीतील सर्वात बिगबजेट सिनेमाचा असल्याचा दावा करणाऱ्या या सिनेमाच्या निर्मात्यांना या सिनेमातील कलाकारांना नव्हे तर दुसऱ्याच कोणालातरी सर्वाधिक मानधन द्यावं लागलं आहे. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट असं वाक्य ज्या हंबीरराव मोहिते यांच्या तोंडी सिनेमात दिसतं त्यावरूनच हंबीररावांनी मराठा साम्राज्यातील लढ्यात किती योगदान दिलं असेल याची कल्पना येईल. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वातील सरसेनापती यांची शौर्यगाथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. यानिमित्ताने संवाद साधताना अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी काही रंजक किस्से सांगितले. या गप्पांमध्ये अर्थातच उल्लेख आला तो या सिनेमातील घोडीचा. सरसेनापती सिनेमातील प्रत्येक गोष्ट ही दर्जेदारच आहे असं सांगताना प्रवीण तरडे यांनी ऐतिहासिक सिनेमाचं गणितच मांडलं. ऐतिहासिक सिनेमाचा विषय, मांडणी, कलाकार यापेक्षाही अशा सिनेमांचं बजेट हाच खरा ऐतिहासिन सिनेमांचा हिरो असतो आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमात बजेटवर हात आखडता न घेतल्यानचे त्याची भव्यता दिसतं अस प्रवीण तरडे यांनी सांगितलं. मुळशी पॅटर्न या सिनेमाने प्रवीण तरडे हे नाव घराघरात पोहोचलं. नुकत्याच रिलीज झालेल्या धर्मवीर या सिनेमाचं दिग्दर्शनही प्रवीण तरडे यांनी केलं आहे.

सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमातील मुख्य व्यक्तीरेखा त्यांनी साकारली आहे. या सिनेमातील कलाकारांपैकी एका खास कलाकाराचा पर डे सर्वात जास्त होता असं प्रवीण तरडे सांगताच उत्सुकता ताणली गेली नसती तरच नवल. या सिनेमात प्रवीण तरडेंवर जे घोडेस्वारीचे सीन शूट झाले आहेत त्या सीनमधील घोडी सेलिब्रिटी आहे. या सिनेमात सर्वाधिक मानधन हे त्या घोडीनेच घेतलं आहे. तान्हाजी…द अनसंग हिरो या सिनेमात अभिनेता अजय देवगण यानेही हीच घोडी वापरली होती. हंबीररावट सिनेमाच्या शूटिंगसाठी मुंबईतून एसी ट्रकमधून या घोडीला शूटिंगच्या ठिकाणी आणलं जायचं. तिचा रोजचा आहार, तिला लागणारी एसी व्यवस्था यावर निर्मात्यांनी अगदी हात सोडून खर्च केला. यालाही खास कारण आहे. या घोडीने आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानं तिला सेटवरचे काही विशिष्ट शब्द पाठ झाले आहेत. रोल साउंड म्हटलं की ती घोडी अंग झटकून ताठ होते. रोल कॅमेरा म्हटलं की पायाने धूळ मागे सारते, अॅक्शन म्हटलं की ती धावायला लागते आणि कट म्हटलं की थांबते. तिचा हा सेन्स अतिशय उत्तम आहे. प्रवीण तरडे यांनी या घोडीचे एकेक किस्से सांगताना सिनेमातील ही सेलिब्रिटी घोडी सर्वाधिक मानधन का घेत असेल याची खात्री पटते.