मराठी मालिका अभिनेता जिंतेंद्र पोळ याला कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. जितेंद्र पोळ हा सन मराठी वाहिनीवरील संत गजानन शेगावीचे या मालिकेत दामोदर पंत हे पात्र साकारत आहे. जितेंद्र पोळ कोल्हापूर येथे वास्तव्यास आहे. महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी त्याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र पोळ याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका विवाहसंस्थेवर नाव नोंदवले तिथेच नाव असलेल्या एका महिलेशी त्याने संपर्क साधला. त्यानंतर या दोघांची ओळख झाली आणि त्याने लग्न करण्यासाठी त्या महिलेला मागणी घातली. त्यानंतर त्या महिलेने लग्नासाठीचा प्रस्ताव नाकारला. परंतु जितेंद्र त्या महिलेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करू लागला.

ती महिला ज्या ठिकाणी काम करत होती तिथेही मागोमाग जाऊन जितेंद्र तिच्याशी बोलण्याचा आणि भेटण्याचा प्रयत्न करू लागला. प्रसंगी त्या महिलेची वाट अडवून तो तिला त्रास देऊ लागला. यात अश्लील कृत्य देखील तो करू लागल्याने शेवटी त्या महिलेने जितेंद्र विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. विनयभंग केल्याप्रकरणी जितेंद्रला अटक करण्यात आली असून याप्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे असे पोलिसांनी म्हटले आहे. जितेंद्र पोळ हा मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो या सृष्टीत स्थिरावलेला पाहायला मिळतो. स्वराज्यरक्षक संभाजी, घाडगे अँड सन्स, सावित्रीजोती, क्रिमीनल्स, जुळता जुळता जुळतंय की, श्री गजानन शेगावीचे अशा अनेक मालिकांमधून त्याने छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. क्रिमीनल्स या मालिकेत त्याने पीएसआय प्रवीण ची भूमिका देखील साकारली आहे. मात्र रील लाईफमध्ये मिळालेल्या भूमिकांचे अनुकरण न करता गुन्हेगारीचा मार्ग अवलंबल्याने जितेंद्रला अटक होणे स्वाभाविक आहे.