अभिनेता संकर्षण कऱ्हाडे तू म्हणशील तसं या नाटकाच्या दौऱ्यामध्ये सध्या व्यस्त आहे. या नाटकात काम करत असताना अनेक अनुभव त्याला आले. यातूनच त्याने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळतो. नुकताच या नाटकात काम करत असताना झालेल्या दुखपतीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणतो की, तारीख २० जाने. २०२०. वाशी चा प्रयोग. नाटक ओपन होऊन बरोब्बर महिना झाला होता. आमच्या नाटकामध्ये धावपळ थोडी जास्तं आहे.माझं पात्रं अवखळ असल्यामुळे काही मुव्हमेंट्स आमचा दिग्दर्शक प्रसाद ओक दादा ने जरा fast दिल्या आहेत.
त्यातली एक टेबलावर ऊडी मारायची मुव्हमेंट करतांना माझा पाय स्टेजवर मुरगळला आणि स्वत:ला सावरून मी उठे पर्यंतच; टेनीस चा बाॅल पायाच्या घोट्यात ठेवलाय की काय.. असं वाटावं इतका पाय सुजला. अगदी काही क्षणांत. तो प्रयोग तसाच थोडा लंगडत केला. रात्री पुण्यात आलो कारण, दुसरे दिवशी दुपार १२.३० आणि संध्याकाळ ५.३० असे दोन प्रयोग होते. मग मी रात्रीच १२.३० वा. संचेती हाॅस्पिटल ला गेलो. डाॅक्टरांनी X Ray काढला.
“हेअर लाईन क्रॅक, स्वेलींग , रेस्ट , आॅपरेट, प्लास्टर..” ह्या सगळ्या शब्दांचा वापर करुन ते भलं मोठं काहीतरी सांगत होते.. मी डायरेक्ट एवढंच विचारलं , उद्या दोन प्रयोग करता येतील असं काहीतरी सांगा. त्यांनी दिलेल्या गोळ्या घेऊन रात्री झोपलो आणि सकाळी पलंगाच्या खाली पायच ठेवता आला नाही. मला घाम फुटला. थिएटर ला जाण्याआधी परत गोळ्या घेतल्या….. आणि प्रयोग सुरु केला. त्या particular ऊडी च्या मुव्हमेंट ला जिथे मला काल लागलं होतं.. आज सगळे बॅकस्टेज आर्टिस्ट सुद्धा विंगेत येऊन थांबले होते. पण , दोन्ही प्रयोग सुरळीत आणि मस्तं झाले. नंतर काही दिवसांची gap होती. आराम केल्यावर सूज पण गेली आणि पाय दुखला पण नाही.