स्टार प्रवाहवरील सांग तू आहेस का या मालिकेतली आणखी एक अभिनेत्री लवकरच विवाहबद्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेतील दीप्तीचे पात्र साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री दळवी हिचा साखरपुडा झाला होता. आता लवकरच या मालिकेतली शांभवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री “सिद्धी पाटणे ” देखील विवाहबंधनात अडकणार आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री सिद्धी पाटणे हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी तिचा होणारा नवरा विशाल दलाल यानेही हजेरी लावून सिद्धीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवस आणि लग्न ठरल्याचा विधी असे दोन्ही क्षण यावेळी साजरे करण्यात आले. विशाल दलाल हा बदलापूरचा असून आर्किटेक्ट आहे. सध्या स्टुडिओ आर्कि-कल्चर येथे तो प्रोजेक्ट आर्किटेक्ट म्हणून कार्यरत आहे. अभिनेत्री सिद्धी पाटणे ही मूळची खेड, रत्नागिरीची. इथेच तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे मुंबई युनिव्हर्सिटीमधून तिने एमबीएचे शिक्षण घेतले. मालिका चित्रपटातून काम करत असताना तिला एका व्हिडीओ सॉंगमध्ये झळकण्याची नामी संधी मिळाली. “गोव्याच्या किनाऱ्याव…” या गाजलेल्या गाण्यामुळे सिद्धीला तुफान लोकप्रियता मिळाली होती. सुहृद वर्डेकर आणि सिद्धी पाटणे यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. हे दोन्ही कलाकार या गाण्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. या गाण्यासोबतच सिद्धी आणि सुहृद आणखी काही गाण्यातून एकत्रित झळकले आहेत. सिद्धीने मालिका आणि चित्रपटातूनही काम केले आहे. प्रेमा तुझा रंग कसा, विठू माऊली, श्री गुरुदेवदत्त, सांग तू आहेस का अशा वेगवेगळ्या मालिकांमधून तिने अभिनय साकारला आहे.

श्री गुरुदेवदत्त मालिकेतून सिद्धीला पार्वतीची आव्हानात्मक भूमिका साकारण्याची नामी संधी मिळाली होती ही भूमिका तिने अतिशय सुरेख बजावली होती. सांग तू आहेस का या स्टार प्रवाहवरील मालिकेतून ती शांभावी साकारत आहे. शिवाय मधल्या काळात काही ज्वेलरीसाठी तिने मॉडेलिंग देखील केले आहे. आता लवकरच सिद्धी पाटणे दलाल घराण्याची सून होणार आहे. मात्र ती लग्न कधी करणार याची उत्सुकता आता तिच्या चाहत्यांना लागून राहणार हे नक्की. मालिकेत तिने केलेल्या अभिनयाची नेहमीच स्तुती होताना पाहायला मिळते. तुर्तास अभिनेत्री सिद्धी पाटणे हिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…