गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. इराकमध्ये वाळूची नदी वाहते आहे हे पाहून अनेकांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. मात्र ह्या व्हिडीओ मागचे नेमके सत्य काय आहे ते तुम्हाला माहीत आहे का, चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओचे सत्य काय आहे ते… खरं तर वाळूच्या नदीचा हा व्हिडीओ आहे २०१५ सालचा. १६ नोव्हेंबर २०१५ रोजी इराकमध्ये एक भयानक वादळ आले होते. तब्बल आठवडाभर आलेल्या या वादळामुळे इराकचा बराचसा भाग नुकसानग्रस्त झाला होता. तर डझनभर माणसं या वादळामुळे मृत पावली होती. एवढेच नाही तर या वादळाचा फटका इजिप्त, इस्राईल, जॉर्डन आणि सौदी अरेबिया या देशांना देखील बसला होता. त्यामुळे या वादळाची तीव्रता किती मोठी होती हे तुमच्या लक्षात येईल.

वास्तवात इराकचा परिसर वळवंटाचा असला तरी तिथे एका विशिष्ट कालावधीत खूप थंडी पडत असते. अशातच वादळी वाऱ्यामुळे तिथे गारांचा पाऊस झाला होता. अहोरात्र पडलेल्या गारांच्या पावसामुळे ह्या गारा वरच्या दिशेतून उतारामुळे वाळूसोबत प्रवाहित झाल्या होत्या. साधारण पर्वतीय भागात गारांचा पाऊस अनेकांनी अनुभवला आहे तर आपल्या महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्याच्या पावसात गारांचा पाऊस अनेकांनी अनुभवला आहे. मात्र इराकच्या प्रदेशात पडलेल्या ह्या गारा सर्वांना आश्चर्यकारक वाटल्या आणि त्या नदीच्या प्रवाहासारख्या वाहू लागल्या त्यामुळे ह्याचा व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह तिथल्या स्थानिक लोकांना झाला. साहजिकच ही आश्चर्यकारक बाब असली तरी असंख्य पडलेल्या गारांमुळे वाळू सोबत त्या उताराच्या दिशेला वाहू लागल्या त्यामुळे हा व्हिडीओ पाहणाऱ्याला इराकमध्ये वाळूची नदी असावी असा भास निर्माण झाला. अर्थात हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल झाल्याने इराकमध्ये अशी नदी असू शकते असा विश्वास पाहणाऱ्याच्या मनात निर्माण झाला आणि प्रत्येकाने ह्या बातमीची शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवला आणि पटापट शेअर होऊ लागला. तुम्ही हा व्हिडीओ नीट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की व्हिडिओतील त्या व्यक्तीने नदीची वाळू हातात घेतली होती त्यावेळी वाळू सोबत छोटे छोटे गोळे असलेल्या गारांचा त्यात समावेश होता. त्यामुळे गारांच्या पावसामुळे आसपासची वाळू गारांसोबत प्रवाहित झाली आणि त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले एवढेच!!!