सैराट, गस्त, फ्री हिट दणका या चित्रपटानंतर तानाजी गळगुंडे लवकरच ‘रघु ३५०’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जाते. तानाजीसह चिन्मय उदगीरकर, आदिती कांबळे, संजय खापरे, मिलिंद दस्ताने यासारखे बरेचसे ओळखीचे चेहरे चित्रपटात झळकणार आहेत. चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले त्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटानिमित्त तानाजी गळगुंडे याने आरपार पॉडकास्टला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात त्याने त्याच्या लग्नाबद्दलही मत मांडलं आहे. कोणत्या मुलीची ओळख नसताना तिच्यासोबत लग्न करण्यापेक्षा मी अगोदर लिव्हइनला पसंती देईल असे तो या मुलाखतीत म्हणताना दिसतो. या मुलाखतीत त्याने लग्नसंस्था या प्रथेला थोडासा नकार दर्शवला आहे.
लग्नाबद्दल तानाजीचे म्हणणे आहे की, ” मला लग्नसंस्था पटत नाही. कदाचित मी लई पुढं गेलो असेल पण मला आता लिव्ह इन रिलेशन पटायला लागलं आहे. कारण तुम्ही लग्न करणार तेव्हा त्या मुलीला तुम्ही आवडता की नाही हे बघायचं. त्या मुलीला आपण आवडतो की नाही माहीत नाही. पण तरीही लग्न करायचं. सगळ्या लोकांनी एकत्र यायचं, एका दिवसासाठी एवढा मोठा अवडंबर का?. ५- १० लाख रुपये खर्च करायचे आणि वाजत गाजत वरात काढायची. बँडबाजा लावून नाचायचं. हा तुम्ही नाचू शकता ती चांगली गोष्ट आहे पण त्यात एखादी छोटी पार्टी करून पण हे करू शकतो. लग्न करण्यावर माझा विचार वेगळा आहे कारण मला लिव्ह इन रिलेशन ग्रेट वाटत. पण लग्न हे रजिस्टर पद्धतीने करावं असं मला वाटतं. २-४ हजारात हार तुरा घालून लग्न करावं.” तानाजी च्या या मतावर मात्र नेटकऱ्यांनी खरपूस शब्दांत त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुळात लिव्ह इन मध्ये राहून तू कित्येक मुलींना फसवू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.
शिवाय या अशा पद्धतीने राहणे म्हणजे कुठलीही जबाबदारी झिडकारण्यासारखे आहे. ज्यांना जबाबदारी नको आहे ते लोक लिव्हइन मध्ये राहतात असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. तर काहींनी तानाजीला लग्नाचं महत्व पटवून दिल आहे. उतारवयात तुम्हाला पत्नीचीच साथ हवी असेही मत मांडण्यात आले आहे. दरम्यान तानाजी लग्नाच्या अवास्तव खर्चावर हे त्याचं मत मांडलेल आहे. जेव्हा लिव्हइन मध्ये राहता तेव्हा तुम्ही त्या मुलीला जवळून ओळखू शकता लग्नाचा खूप मोठा खर्च टाळून तुम्ही फक्त रजिस्टर पद्धतीनेही लग्न करू शकता असे तो या मुलाखतीत म्हणत आहे.